वेग मंदावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:54+5:302021-03-06T04:36:54+5:30
निवारा शेडची मागणी सातारा : सातारा शहरालगतच्या संभाजीनगर येथील शिवराज चौकात एसटी थांबा असून, निवारा शेडअभावी ज्येष्ठ नागरिकांना ...
निवारा शेडची मागणी
सातारा : सातारा शहरालगतच्या संभाजीनगर येथील शिवराज चौकात एसटी थांबा असून, निवारा शेडअभावी ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासन्तास एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथे निवारा शेड उभारावे, अशी मागणी विलासपूर व संभाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे.
लसीकरणाला प्रारंभ
महाबळेश्वर: येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ लसीकरणास प्रारंभ झाला असून, ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोविड १९ लस देण्यात येत आहे. लस देणारे कोविडयोद्धा डॉ. एस. आर. चौगुले, डॉ. पी, के. देशमुख, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.
पेरुबाग नामशेष
सातारा : गेल्या शंभर वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या लिंबच्या पेरुबागा कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे काळाच्या ओघात नामशेष होऊ लागल्या आहेत. येथील पेरू आता इतिहासजमाच झाला आहे. या पेरुबागा नव्याने निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.
चोऱ्यांमुळे शिंगणापूरकर त्रस्त
दहिवडी : शिंगणापूरमध्ये अनेक दिवसांपासून मंदिर परिसरातून दुचाकी, शिवारातून वीजपंप, शेळ्या-मेंढ्या, नवसाचे सोडलेले खोंड, पाळीव जनावरांच्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. शिखरशिंगणापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मात्र सध्या येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
चित्रकला स्पर्धेत यश
मायणी : श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नवमहाराष्ट्र विद्यालय, चितळी, ता. खटाव येथील प्रतीक हरिश्चंद्र माने याने पाचवी ते आठवी या प्राथमिक या गटात संस्थेच्या सर्व २०० पेक्षा जास्त शाखांत तृतीत क्रमांक मिळविला.
दुरुस्तीची मागणी
सातारा : आनेवाडी टोलनाका ते उडतारे या हद्दीतील सेवा रस्ता पूर्णता खचून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. तरीही अनेक वाहनचालक सर्कस करत खचलेल्या सेवा रस्त्याच्या कडेने वाट काढून प्रवास करत आहेत.
अपघाताचा धोका
सातारा : साताऱ्यात राजपथावर अनेक वाहनचालक थरार निर्माण करत आहेत. वाहने वेगाने दामटवण्याचे उद्योग धूम स्टाइल दुचाकीस्वार करत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. देवी चौकात तर दररोजच धडकाधडकी होत आहे. यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण
सातारा : रिक्षा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून कर्णकर्कश आवाजात जाहिरात करणाऱ्या वाहनांमुळे फलटणसह उपनगरांतील नागरिक जनता हैराण झाली आहे. यावर पोलिसांनी तातडीने मर्यादा आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिवसभर आवाजामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.