Wai News: वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसच्या इंजिनमधून धूर, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:44 PM2022-06-01T17:44:55+5:302022-06-01T18:20:16+5:30
चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
वाई : महाबळेश्वरहून वाईच्या दिशेने येणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसला बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पसरणी घाट उतरून वाई बसस्थानक परिसरात आल्यानंतर आग लागली. इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने चालक सतर्क झाला. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, गाडीचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, महाड येथून लग्नाच्या वऱ्हाडींना घेऊन खासगी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ८००८) ही वाई-पसरणी घाट उतरून लग्नाच्यास्थळी निघाली होती. वाईमध्ये एसटी बसस्थानक परिसरात ही बस आली असता, बसमधून धूर येत असल्याचे नागरिकांनी चालकास सांगून सतर्क केले. चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.