ाहाराष्ट्र बँकेत चोरट्यांचा धुडगूस !
By admin | Published: January 3, 2017 11:17 PM2017-01-03T23:17:47+5:302017-01-03T23:17:47+5:30
भिलार शाखा : वीस एटीएम कार्ड अन् बायोमॅट्रिक यंत्रे चोरले; साहित्य विस्कटले
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे महाराष्ट्र बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री झाला. यावेळी चोरट्यांच्या हाती रोकड न लागल्याने चोरट्यांनी बँकेतील वीस एटीएम कार्ड अन् बायोमॅट्रिक मशीनच चोरून नेली. या घटनेची पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिलार येथील वर्दळीच्या मुख्य चौकात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. बँकेच्या पाठीमागील खिडकीतून चोरट्यांनी सोमवारी रात्री आत प्रवेश केला. चोरट्यांनी बँकेतील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून ग्राहकांचे २० एटीएम कार्ड, बायोमॅट्रिक मशीन व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी समजताच शाखा प्रमुख राजेंद्र विष्णुपंत बागडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात माहिती दिली.
भिलार येथेच आठ दिवसांत चार दुकाने फोडली गेली आहेत. यामध्ये साहित्य व रोख रकमेसहएक लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डडिस्क, कॅमेरा, एलसीडी असा ऐवज लंपास केला आहे. काही नागरिकांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या नसल्याने याबाबत तपास होऊ शकला नाही. पाचगणी
पोलिस ठाण्यात चोरीची नोंद झाली
असून, सहायक फौजदार नंदकुमार कुलकर्णी, मुबारक सय्यद तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)