कारमध्ये आढळला चक्क साप, सातारच्या केसरकर पेठेत उडाला गोंधळ
By दीपक देशमुख | Published: March 18, 2023 03:22 PM2023-03-18T15:22:35+5:302023-03-18T15:23:28+5:30
कारभोवती बघ्यांची मोठी गर्दी
सातारा : येथील केसरकर पेठेत नगरपालिकेच्या मागे शनिवारी दुपारी एका कारमध्ये चक्क साप असल्याचे आढळला. यानंतर कार चालकाने तात्काळ सर्पमित्राला याची माहिती दिली. यानंतर सर्पमित्राने मॅकॅनिकरवी बॉनेट खाेलले व कारमधून साप बाहेर काढला. या सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला मस्के यांनी आपली कार पार्क केली होती. या कारमध्ये साप जावून बसला. मस्के यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र महेश शिंदे यांना फोन केला. यानंतर महेश शिंदे यांनी कारमध्ये साप शोधण्यास सुरूवात केली. कारमध्ये अडचणीच्या जागी साप लपून बसल्याने शोधणे अवघड झाले.
अखेर नजिकच्या गॅरेजमधील मॅकॅनिकसना बोलावण्यात आले. साप बाॅनेटमध्ये दडल्याचा संशय असल्याने मॅकेनिकनी बॉनेट खाेलले. बॉनेट खोलताच साप कारमध्ये गेला. यानंतर सर्पमित्र शिंदे यांनी साप पकडला. सुमारे ७ फुट लांबीचा हा साप धामण जातीचा असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच कारभोवती बघ्यांची मोठी गर्दी झाली. या घटनेची नोंद वन विभागाला दिली असून सापाला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.