अज्ञान आणि भीतीतून सापाला मुकावे लागतेय त्याच्या प्राणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:02+5:302021-08-13T04:45:02+5:30
सातारा : नागपंचमीला वारुळावर जाऊन साप पुजायला महिलावर्ग गर्दी करतात. मात्र, वर्षातील ३६४ दिवस साप दिसला की सगळेच त्याच्या ...
सातारा : नागपंचमीला वारुळावर जाऊन साप पुजायला महिलावर्ग गर्दी करतात. मात्र, वर्षातील ३६४ दिवस साप दिसला की सगळेच त्याच्या जिवावर उठतात. अज्ञान आणि भीतीतूनच सापाला आपल्या प्राणाला मुकावे लागते. अन्नसाखळीतील महत्त्वपूर्ण असलेल्या या घटकाविषयी अजूनही समाजात अपेक्षित प्रबोधन झाले नाही.
सातारा जिल्ह्यात नागरी वस्तीजवळ तसेच शेतांमध्ये प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे चार विषारी साप आढळून येतात. याशिवाय आढळून येणारा कोणताही साप विषारी नाही. अन्न साखळीत सर्पांचे स्थान महत्त्वाचे आहे. जनसामान्यांमध्ये सापांविषयीचे अनेक गैरसमज आहेत. या पसरलेल्या अंधश्रध्देमुळे सर्पांविषयीच्या अज्ञानातून सर्प-मनुष्य संघर्ष निर्माण होतो. शहरी व ग्रामीण भागात बहुतांश सर्पमित्र हे सर्पांना सोडविण्यासाठी धडपडत असतात. ग्रामीण भागात साप मारण्याचे प्रमाण शहरांच्या तुलनेत अधिक आहे.
चौकट :
तो ना दूध पितो ना डुक धरतो
साप हा सस्तन प्राणी असून तो पूर्णत: मांसाहारी आहे. यामुळे साप दूध पितो आणि डुक धरतो या निव्वळ गैरसमजुती आणि अंधश्रध्दा आहे. प्रत्येक साप आपले भक्ष्य पूर्णपणे गिळंकृत करतो. उंदीर, पाली, घुशी, सरडे, बेडूक आणि मासे हे सापाचे प्रमुख खाद्य आहे. तसेच बहुतांश सर्प हे झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडीही खातात. नाग, मण्यारसारखे विषारी साप बिनविषारी सापानाही आपले खाद्य बनवितात.
सर्पदंश झाल्यावर काय करावं?
सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी टोल-फ्री १०८ क्रमांकावर संपर्क साधावा. सर्पदंश झालेला शरीराचा अवयव हृदयाच्या खालच्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. विषारी किंवा निमविषारी सर्पदंश असेल तर त्याचे विष हे कुठल्याही मांत्रिकाच्या तंत्र-मंत्रांनी उतरू शकत नाही. विषारी सर्पदंशावर केवळ प्रतिसर्पविष हेच एकमेव औषध असून ग्रामीण तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात ते उपलब्ध असते.
पाॅइंटर :
सापांना अंत:कर्ण असतात, त्यामुळे आवाजाचे ज्ञान त्यांना जमिनीतील कंपनांनी होते.
सापाचे गंधज्ञान चांगले असते. सापाची जीभ लांब व टोकाजवळ दुभागलेली असते.
भक्ष्याच्या शोधात साप आपली जीभ सतत आतबाहेर करत असतो.
साप एकाचवेळी दोन्ही डोळ्यांनी दोन वेगवेगळी दृष्ये बघतो. हलणारे भक्ष्य किंवा वस्तू त्याचे लक्ष वेधून घेते.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग, घोणस, मण्यार, फुरसे
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
साप हा तर शेतकऱ्याचा मित्र
वेगाने सरपटत जाणारा लांबलचक साप दिसताच अनेकांची पाचावर धारण बसते. प्रत्येक सर्प हा विषारीच असतो असे नाही; मात्र सर्पाविषयीची भीती आणि अंधश्रध्देपोटी सर्पांवर मृत्यू ओढावतो. सर्प हा माणसाचा शत्रू कमी अन् मित्रच अधिक आहे. धान्य उत्पादनाला उंदरांपासून संरक्षण देण्याचे प्रमुख कार्य सर्पांकडून पार पाडले जाते, म्हणूनच सापांना शेतकऱ्याचा मित्र असेही म्हटले जाते.
साप आढळला तर...
सापापासून सुरक्षित अंतरावर थांबावे.
सापाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.
पाळीव प्राणी, लहान मुलांना लांब ठेवावे.
सापाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे .
गर्दी आणि गोंगाट करू नये.
वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
गवताळ भागात साप वावरत असेल तर त्यास डिवचू किंवा मारू नये.