पडीक वर्गात साप, विंचवांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:45+5:302021-09-16T04:49:45+5:30
सातारा : कोरोनाचे संकट असल्यामुळे मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाइन वर्ग सुरू झाले. मागील दोन वर्षांपासून शाळा प्रत्यक्षरीत्या बंद ...
सातारा : कोरोनाचे संकट असल्यामुळे मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाइन वर्ग सुरू झाले. मागील दोन वर्षांपासून शाळा प्रत्यक्षरीत्या बंद आहेत, यामुळे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरून मुलांचे भविष्य घडविणाऱ्या शाळा आता साप, विंचवांचे माहेर बनल्या आहेत.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या सर्व शाळांमधून जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, सध्या कोरोनाचे संकट उभे असल्याने दोन वर्षांपासून मुलांना शाळेत न बोलावता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सुरू होते. शाळेत मुलांचे येणे-जाणे नसल्याने शाळेची योग्य स्वच्छता करण्यात येत नव्हती परिणामी शाळेच्या आवारात कचरा साठला. काही शाळांच्या आवारात तर झुडपेही वाढलेली दिसली. शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी शाळांचे दरवाजे आणि खिडक्याही खराब झाल्या आहेत, त्यामुळे शाळेतील वर्गांमध्ये साप, विंचू यांसारखे सरपटणाऱ्या प्राण्यांनी घर केले आहे.
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांची स्वच्छता करून वर्ग सुसज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेची रंगरंगोटी करण्याबरोबरच स्वच्छता करण्यात सध्या प्रशासन व्यस्त आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी का होईना शाळा मात्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.
चौकट
वर्गखोल्यांतील धूळ हटेना
जिल्ह्यात २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर केल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही जाणे बंद केले होते. पोषण आहाराच्या वाटपाचा प्रश्नही प्रशासनाने निकालात काढल्यामुळे त्या कामासाठीही शाळेत येणे बंद झाले होते. तब्बल दीड वर्ष शाळा बंद असल्याने शाळेतील दारे व खिडक्या यावर चांगलीच धूळ साठली आहे.
शाळा स्वच्छतेची जबाबदारी मुख्याध्यापकांची
प्रशासकीय प्रमुख म्हणून शाळा आणि परिसर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. शाळेत उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांसह परिसरातील लोकांकडून ही स्वच्छता करून घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. त्यामुळे शाळा आणि परिसर कितीही अस्वच्छ असला तरी तो स्वच्छ करून घेण्यासाठी मुख्याध्यापक कसोशीने प्रयत्न करत आहेत.
कोट :
शाळा सुरू होण्याच्या निर्णयाबाबत शासनाने अद्यापही कोणतीही सूचना जारी केलेली नाही, तरीही शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील शाळा तातडीने सुरू होतील, या हिशेबाने नियोजन करण्यात आले आहे. रिकाम्या असलेल्या शाळांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध शाळांमध्ये स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा