सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यात लम्पीचा शिरकाव, कऱ्हाडला धोका वाढला
By नितीन काळेल | Published: September 16, 2023 07:04 PM2023-09-16T19:04:10+5:302023-09-16T19:05:12+5:30
दुसऱ्या टप्प्यात 'इतक्या' जनावरांचा मृत्यू
सातारा : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव आठ तालुक्यात पोहोचला आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात धोका अधिक आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ३५० जनावरे बाधित झाली असून यामधील २६ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना लसीकरण केले आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यापर्यंत २० हजारांहून अधिक जनावरांना लम्पीने गाठले होते. तर १ हजार ४८० हून अधिक पशुधनाचा मृत्यू झाला होता. या काळात बळीराजा पुरता कोलमडून पडला होता. मात्र, एप्रिलपासून लम्पीचा आजार कमी होत गेला. पण, आॅगस्ट महिन्यापासून लम्पीचा जिल्ह्यातील प्रादूर्भाव वाढत चालला आहे. याचा अऱ्थ लम्पी संकटाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी धोका वाढला आहे. लाख मोलाचे जनावर बळी पडले तर भरपाई कशी करणार अशी चिंता लागली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम वेगाने पूर्णत्वास आणली आहे.
लम्पी चर्मरोगाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात सुरू झालेला आहे. फलटण तालुक्यातून प्रादुर्भावाला सुरुवात झाली. आता आठ तालुक्यात लम्पी पोहोचला आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात अधिक प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५० जनावरांना लम्पी झाला. त्यातील २४५ पशुधन हे कऱ्हाडमधीलच आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २१ पशुधन हे कऱ्हाडमधील बळी गेलेले आहे. तर यानंतर कोरेगाव, वाई, फलटण तालुक्यात बाधित जनावरे असून प्रमाण कमी आहे. तर जावळी पाटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांत लम्पी बाधित जनावरे अजुनतरी आढळून आलेली नाहीत. तर लम्पीने फलटण, वाई, खटाव या तालुक्यातील प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झालेला आहे.
साडे तीन लाख जनावरांना लसीचा डोस...
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव हा गोवर्गीय पशुधनालाच होत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गाय, बैल आणि वासरे यांना लसीकरण करण्यासाठी वेगाने पावले उचलली. ३ लाख ५२ हजार जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३६५ जनावरांना लसीचा डोस देण्यात आलेला आहे.
१० बैलांचा मृत्यू...
लम्पीच्या दुसऱ्या टप्प्यात ९ संकरित गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच १० बैलांचाही बळी गेला आहे. एका बैलाची किंमत ५० हजारांपासून पुढे असते. त्यातच बैलापासून शेतीची कामे केली जातात. आता हे पशुधनच लम्पीत मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ लागली आहे.