..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर
By नितीन काळेल | Published: October 3, 2024 05:32 PM2024-10-03T17:32:52+5:302024-10-03T17:33:04+5:30
देशात समान नागरी कायदा यायला हवा
सातारा : ‘रिपाइं’मध्ये अनेक गट आहेत. यामध्ये आमचीच ‘रिपाइं’ खरी आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले गट बरखास्त करुन आमच्या ‘रिपाइं’त सहभागी व्हावे. प्रकाश आंबेडकर यांनीही ‘वंचित’ बरखास्त करावी. पक्षाचे ते अध्यक्ष होणार असतील तर मीही अध्यक्षपद सोडायला तयार आहे. तसेच देशात समान नागरी कायदा यायला हवा, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. सातारा येथे ‘रिपाइं’चा मेळावा होता. यासाठी मंत्री आठवले आले होते.
मंत्री आठवले म्हणाले, आमचा ’रिपाइं’ पक्ष देशात आहे. ‘रिपाइं’तील सर्व गट एकत्र आलेतर ताकद वाढणार आहे. कारण, एकेवेळी राज्यात चार खासदार निवडूण आले होते. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्यात मोठी ताकद उभी राहील. कारण स्वतंत्र लढून काहीच फायदा होत नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी ‘रिपाइं’ने २१ जागांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. आम्हाला ८ ते १० जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, महायुतीत आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आम्ही त्यांच्याबरोबर असल्याने गृहीत धरतात हे खरे. पण, त्याचबरोबर सन्मानही मिळायला हवा. आताच्या निवडणुकीत महायुती १७० जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.
मंत्री आठवले म्हणाले..
- राज्यात ‘रिपाइं’ला दोन महामंडळांची जबाबदारी मिळावी
- राज्यपाल नियुक्त आमदारपदी एकाची नियुक्ती करावी
- देशात समाननागरी कायदा यायला हवा. हिंदू-मुस्लीम समाज एकत्र आणण्यासाठी फायदा होईल
- वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लीम समाजाचा फायदा होईल.
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये बहुमत घ्यावे. भारताबरोबर राहण्याची जनतेची इच्छा आहे.
- पाकिस्तानने काश्मीरमधील आतंकवाद, घुसखोरी थांबवावी.