...म्हणून सर्वसाधारण सभेऐवजी विशेष सभा घेतली होती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:40+5:302021-04-10T04:38:40+5:30
कराड : पूर्वी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येत नाही. १९ जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण ...
कराड : पूर्वी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येत नाही. १९ जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेपुढील १४८ विषयांपैकी २०६ ठरावच माझ्या सहीसाठी आले आहेत. उरलेल्या ठरावांसाठी वेळोवेळी बैठका घेऊन लेखी व तोंडी सूचना केल्या आहेत. तरीही ते ठराव सहीसाठी आलेले नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण सभा न करता विशेष सभा घेतल्याची माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, परवाची विशेष सभा ही कोणाच्याही दबावाखाली रद्द केलेली नाही. सभेमध्ये काही कारण नसताना काहीजणांनी विनाकारण गोंधळ घातला. त्यामुळे शहरात सदस्यांच्या बाबतीत चुकीची व नकारात्मक प्रतिमा तयार होऊ नये यासाठी आपण सभा रद्द केली. जनशक्ती व लोकशाही आघाडी यांनी ठरवून या ऑनलाईन सभेमध्ये दंगा करून विघ्न आणण्याचे आधीच ठरवले होते. त्यामुळेच हे दोन्ही गट सभा ऑनलाईन असतानासुद्धा शासनाच्या कोरोना नियमांना धाब्यावर बसवून पालिकेच्या सभागृहामध्ये मोठी स्क्रीन लावून बसले होते.
वास्तविक सभेची विषयपत्रिका निघून बरेच दिवस झाले होते. या कालावधीत विशेष सभेबद्दल कोणी हरकत घेतली नाही; परंतु गेल्या काही सभांमध्ये फक्त गोंधळ घालून सभा चालू द्यायची नाही, असे धोरण त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आम्ही सभा रद्द करण्यास होकार दिला. होकार दिला नसता तर पुन्हा नेहमीप्रमाणे सभाच होऊ द्यायची नाही हे ठरवून ते सर्वजण आले होते.
विशेष सभेमध्ये शहराच्या विकासाचे व पालिका कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे विषय घेतले होते. मात्र, या दोन्ही आघाड्यांना गावाच्या विकासापेक्षा स्वतःचा अहंपणा महत्त्वाचा वाटतो. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्याचा त्यांचा केविलवाणी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची कामे ठप्प होत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. पालिका अधिनियमानुसार नगराध्यक्षांना विशेष सभा घेण्याचा अधिकार आहे. विजय वाटेगावकर यांनी कायदा संपूर्ण वाचावा अर्धवट वाचून चुकीची माहिती सभागृहाला देऊ नये.
कोरोनासंदर्भात नगरसेविका हुलवान यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, गेली पंधरा दिवस प्रत्यक्ष ग्राऊंडला उतरुन आम्ही काम करत आहोत. मात्र, त्या स्वतः व त्यांचे सहकारी मागच्या लाटेच्या वेळी व यावेळीसुद्धा कोठे आहेत? मुख्याधिकारी डाके यांच्याशी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी चर्चा करून सोमवार पेठेतील लसीकरण केंद्राची सुरुवातही केली आहे? शिवाय शनिवार पेठ येथे पत्रकार भवनात लसीकरण केंद्र आम्ही सुरू करून घेतले आहे. नागरी आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री तेथे पोहोच करून लसीकरण प्रत्यक्ष सुरळीत होईपर्यंत सलग तीन दिवस तेथे थांबलो होतो. या प्रक्रियेत आपण कुठे होता याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.