..म्हणून भावानेच केला बहिणीचा गळा आवळून खून, शिरवळ पोलिसांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 07:00 PM2023-12-26T19:00:08+5:302023-12-26T19:00:24+5:30

शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने दहा दिवसांमध्ये हा प्रकार उघडकीस आणला

so the brother killed his sister by strangulation, Shirwal police caught the suspect | ..म्हणून भावानेच केला बहिणीचा गळा आवळून खून, शिरवळ पोलिसांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

..म्हणून भावानेच केला बहिणीचा गळा आवळून खून, शिरवळ पोलिसांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

शिरवळ : गावातील युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून गावात संबंधिताने अश्लील कृत्य सोशल मीडियावर प्रसारित केल्याने गावात बदनामी होत होती, या कारणातून सख्ख्या भावाने १९ वर्षीय बहिणीचा गळा आवळला. गावाला जात असल्याचा बहाणा करीत बहिणीच्याच स्कार्फने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिरवळ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी शंकर जिमदार महतो (वय २४, मूळ रा.माझीनियापत्ती, ता.माझीसारन, जि.छपरा बिहार सध्या रा.पळशी, ता.खंडाळा) याला अटक केली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे खळवी नावाच्या शिवारातील गट नंबर २३७ मध्ये लिंबाच्या झाडाखाली शनिवार, दि. १६ रोजी एका १९ वर्षीय परप्रांतीय युवतीचा सडलेल्या अवस्थेतील कवटी, विखुरलेले हाडाचे अवशेष, मळकट कपडे, खासगी कंपनीचा गणवेश आढळून आले होते. त्यावरून संबंधित अवशेष मनिषाकुमारी जिमदार महतो (१९, मूळ रा.माझीनियापत्ती ता.माझीसारन जि.छपरा. सध्या रा.शिर्के काॅलनी, शिरवळ ता.खंडाळा) हिचा असल्याचे शेतामधील मानवी कवटी, विखुरलेले हाडांचे अवशेष, कपडे, चप्पल, जागोजागी विखुरलेले केस, कपडे भरलेल्या बॅगा यावरून स्पष्ट झाले होते.

स्वप्निल महांगरे याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून संबंधित युवतीचा घातपात असण्याची शक्यता गृहित धरून पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, शिरवळ पोलिसांच्या पथकाने तपास करीत गोपनीय, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शुक्रवार, दि. २१ रोजी छठपूजेच्या दुसऱ्या दिवशी मृत मनिषाकुमारी महतो हिच्याबरोबर असलेला जेसीबी चालक सख्खा भाऊ शंकर जिमदार महतो याने बहिणीच्याच स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.

शंकर महतो याला अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने शुक्रवार, दि. २९ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांनी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे तपास करीत आहेत.

खुनानंतर घातले श्राद्ध

गुठाळे येथे सख्ख्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, नित्यनेमाने कामावर जाणाऱ्या शंकर महतो याने शिरवळ येथील रामेश्वर मंदिरालगत असणाऱ्या नीरा नदीपात्रात श्राद्ध घातले होते. काहीच न झाल्याच्या आविर्भावात परिसरात वावरत असताना शिरवळ पोलिसांनी त्याला अटक केली.

बेपत्ताची नोंद कुटुंबीयांकडून नाही

गुठाळे येथे अवशेष आढळल्यानंतर अनेक कारणे या घटनांमधून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित युवती २१ नोव्हेंबरपासून बेपत्ता असतानाही कुटुंबीयांकडून शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद न करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Web Title: so the brother killed his sister by strangulation, Shirwal police caught the suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.