..तर मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:47+5:302021-01-19T04:40:47+5:30
सातारा : ‘ रथी-महारथींना वेळ नसतो म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाला थांबायचे का? लोकांच्या हितासाठी जे काही करावे लागेल, ...
सातारा : ‘ रथी-महारथींना वेळ नसतो म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाला थांबायचे का? लोकांच्या हितासाठी जे काही करावे लागेल, ते आजपर्यंत करत आलो आहे. कोणी आडवे आले तर त्याला आम्ही आडवे करू. वेळप्रसंगी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजनही करेन’, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
उदयनराजेंनी सोमवारी मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी केली. मेडिकल कॉलेजचे डीन संजय गायकवाड, तसेच अधिकाऱ्यांकडून उदयनराजेंनी माहिती घेतली, यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘मेडिकल कॉलेजसाठी निधी आला तर भूमिपूजनही करेन. त्यासाठी कॉलेजची निविदा होऊ द्या, त्याचा ठेकेदार कोण असणार हे निश्चित होऊ दे. मग, त्याच्या मानगुटीवर बसून काम करून घ्यायला किती वेळ लागणार आहे. रथी-महारथींना तारेवरील कसरतीमुळे वेळ नसतो. म्हणून एक वर्ष भूमिपूजनाला थांबायचे का? त्यांना वेळ मिळणार नाही म्हणून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? असे होऊ देणार नाही. कोणी आडवे आले तर त्याला आम्ही आडवे करू. लोकांच्या हितासाठी जे काही करावे लागेल, ते आजपर्यंत करत आलो आहे.’
अनेक वर्षे तुम्ही ग्रेड सेपरेटरचा विषय काढला नाही. कासच्या उंची वाढवण्यास किती वर्षे झाली? आमचे वडील प्रतापसिंहराजे नगराध्यक्ष असताना त्यांनी पाइपलाइन करण्याच्या सूचना केल्या. पण, त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर कोणीही पाठपुरावा केला नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विडा उचलला. भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कास प्रकल्पाची उंची वाढविण्याचा विचार केला. कण्हेरमधूनही पाइपलाइन आणली, असेही उदयनराजेंनी सांगितले.
कोरोना लसीबाबत लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींनी लसीकरणाचे उद्घाटन केले, त्यांनीही लस घ्यावी, असा अनाहूत सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. कोरोना लसीबाबत लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींनी लसीकरणाचे उद्घाटन केले, त्यांनीही लस घ्यावी, असा अनाहूत सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.