प्रशासकीय इमारतीचं भिजत घोंगडं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:02+5:302021-01-20T04:39:02+5:30
सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून, प्रशासनाच्या कामकाजावर वाढीव भागाचा ताण हळूहळू वाढू लागला आहे. हा ताण कमी ...
सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून, प्रशासनाच्या कामकाजावर वाढीव भागाचा ताण हळूहळू वाढू लागला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत उभी राहणे गरजेचे आहे. पालिकेने नियोजित इमारतीच्या जागेचे मोजमाप केले असले तरी इमारत उभी राहणार कधी? या प्रश्नाचे उत्तर अजूनतरी गुलदस्त्यात आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाली असून, पालिकेत दरे, शाहूपुरी व विलासपूर या ग्रामपंचायती नव्याने समाविष्ट झाल्या आहेत, तर खेड, करंजे, कोडोली, गोडोली व संभाजीनगर या ग्रामपंचायतींचा काही भाग पालिका हद्दीत आला आहे. पालिकेने हद्दीत आलेल्या ग्रामपंचायतींचे दप्तर ताब्यात घेतले आहे. हद्दवाढीमुळे पालिकेला शहराबरोबरच वाढीव भागातही मूलभूत सेवा-सुविधा देणे क्रमप्राप्त बनले आहे. या सुविधा उपलब्ध करत असताना, पालिका प्रशासनावरील कामकाजाचा भारही हळूहळू वाढू लागला आहे. कामकाजानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढू लागली आहे.
या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालिकेची नियोजित प्रशासकीय इमारत लवकरात-लवकर उभी राहणे गरजेचे आहे; परंतु अद्यापही तशा कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. शहर विकास विभागाने नियोजित इमारतीच्या जागेचे मोजमाप केले असून, मंत्रालयातील अग्निशनम विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. याला अद्याप हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही. प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तरी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मंजूर झाल्याशिवाय इमारतीचे कामकाज सुरू होऊ शकत नाही. या सर्व प्रक्रियेला आणखी किती कालावधी लागतो? हा प्रश्नच आहे.
(चौकट)
६३ हजार चौरस फूट
क्षेत्रात बांधकाम
- सदर बझार येथे तब्बल ६३ हजार चौरस फूट क्षेत्रात भव्यदिव्य अशी प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.
- तीन वाहनतळ, सुसज्ज सभागृह, आर्ट गॅलरी, नगराध्यक्ष, सभापतींसाठी स्वतंत्र दालन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलर पॅनल अशा सर्व सोयी-सुविधांचा अंतर्भाव या इमारतीत केला जाणार आहे.
- या इमारतीला एकूण नऊ मजले असणार आहेत. त्यातील सहा मजल्यांवर प्रशासकीय कामकाज चालणार असून, तीन मजल्यांवर वाहनतळ असणार आहे.
(कोट)
खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेच्या नियोजित इमारतीच्या जागेचे मोजमाप केले आहे. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून इमारत लवकरात लवकर उभी करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
- माधवी कदम, नगराध्यक्षा
फोटो : १९ सातारा पालिका