खटाव-माण तालुक्यांतील सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:18+5:302021-05-04T04:18:18+5:30
वडूज : ‘बाधितांची वाढती संख्या पाहता खटाव-माण तालुक्यांत अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची फार आवश्यकता आहे. त्यासाठी सामाजिक संस्था व ...
वडूज : ‘बाधितांची वाढती संख्या पाहता खटाव-माण तालुक्यांत अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची फार आवश्यकता आहे. त्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे,’ असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात खटाव-माण तालुक्यांतील विविध ठिकाणी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, तर शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही पालन करीत जबाबदारी पार पाडली. मात्र, तरीही या कोरोना संसर्गामुळे बाधितांचा आकड्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासन प्रशासन स्तरावर सर्व ती खबरदारी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यासह जिल्ह्यात दररोज कोरोना महामारीत हजारो बाधित रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांची संख्या खटाव-माण तालुक्यांत लक्षणीय दिसून येत आहे. संसर्गजन्य साखळी तोडताना बाधित रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा झगडत आहेत. खटाव-माण तालुक्यांत ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह खासगी रुग्णालयांत बाधित रुग्णांची संख्या जादा आहे. काही दिवसांपूर्वी गावपातळीवर शाळा व मंगल कार्यालयामध्ये होमआयसुलेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत. परंतु ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा लक्षात घेता या सुविधा सुरू करण्यासाठी प्राथमिक प्रयत्न सुरू करणे काळाची गरज आहे. खटाव- माण तालुक्यांतील सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिकेसाठी प्रयत्नशील राहावे.
‘जिल्हा व जिल्ह्याबाहेर रुग्ण नेहण्यासाठी जिल्हा व जिल्ह्याबाहेरून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी लागत आहे. यामध्ये बराचसा वेळ जातो. प्रसंगी रुग्णांच्या जीवाला धोकाही संभवतो. त्यासाठी या भागातील दानशूर व्यक्ती किंवा सामाजिक संस्थेच्यावतीने रुग्णवाहिका लोकार्पण करावी.
भौगोलिक रचनेत खटाव-माण तालुका दुष्काळी असला तरी या भागातील लोकांचे दातृत्व मोठे आहे. त्यामुळे सध्याची कोरोना महामारी काळातील गरज ओळखून अत्याधुनिक रुग्णवाहिका या भागातील रुग्णासाठी जीवनदायी ठरेल,’ असा विश्वासही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी व्यक्त केला.