समाजकल्याण आयुक्त घाटे निलंबित
By admin | Published: October 18, 2015 12:21 AM2015-10-18T00:21:03+5:302015-10-18T00:21:03+5:30
सोलापुरातील शिष्यवृत्ती घोटाळा : गुन्हा दाखल झाल्याने रजेवर
सांगली : सोलापूर येथील समाजकल्याण विभागातील दोन कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याला जबाबदार धरून राज्य शासनाने शुक्रवारी तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे यांना निलंबित केले. घाटे सध्या सांगली येथे सहायक समाजकल्याण आयुक्त आहेत. घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ते सध्या वैद्यकीय रजेवर गेल्याचे सांगण्यात आले.
दहावी उत्तीर्ण मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. समाजकल्याण विभागामार्फत वितरित होते. घाटे सोलापूर येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असताना तेथे दोन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यात घाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह अनधिकृतपणे सांगली जिल्ह्याकडे हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे.
अधिकाराचा गैरवापर आणि आर्थिक घोटाळ्यास जबाबदार धरून घाटे यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (आस्थापना) लक्ष्मीकांत महाजन यांनी दिली.
सोलापूर येथील शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा चव्हाट्यावर आल्यामुळे घाटे यांच्या कार्यकालातील सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे. सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यातीलही त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने खास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सांगलीतील भरतीमध्येही गोलमाल
समाजकल्याण विभागाच्या सांगली येथील कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर घाटे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून भरती प्रक्रिया झाल्याच्या तक्रारी आहेत. शिपायास शिष्यवृत्ती वाटपासारख्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी देणे, कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देणे यासह अनेक तक्रारी घाटे यांच्याविरोधात राज्य शासनाकडे गेल्या आहेत. या सर्व प्रकरणांचीही स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत शासनाने चौकशी सुरू केली आहे.