रहिमतपूरकरांमुळे सामाजिक कार्यास बळकटी
By admin | Published: July 31, 2015 01:04 AM2015-07-31T01:04:45+5:302015-07-31T01:05:12+5:30
राणी बंग : विविध संस्थांच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान
रहिमतपूर : सामाजिक काम करताना लोकांचा आशीर्वाद, प्रेम पाठीशी असावे लागते. आपण सर्व शैक्षणिक संस्था एकत्र येऊन माझा व माझ्या सहकार्यांचा सन्मान, बहुमान केला. हा सन्मान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गैर आदिवासी लोकांचाही आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी भारावून गेले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत डॉ. राणी बंग यांनी रहिमतपूरवासीयांनी जो आमच्यावर विश्वास दाखविला आहे. त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. आपल्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळे सामाजिक कार्यास अधिक बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पंचक्रोशी शिक्षण मंडळ, आदर्श शिक्षण संस्था, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, चौंडेश्वरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुला-मुलींसाठी तारुण्यभान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विविध संस्थाच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी चित्रलेखा माने-कदम, सुनील माने, नंदकुमार माने-पाटील, प्रेमलता माने, अरुण माने, एस. के. माने, वि. वा. साळवेकर, आशा भोसले यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बंग म्हणाल्या, ‘आपल्या समाजात नानाविध प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्याला पाठबळाची व प्रोत्साहानाची गरज असते.
यातूनच सशक्त समाजाची निर्मिती होत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा जिल्हा व गडचिरोली जिल्हा यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. रहिमतपूर जसं आपलं घर आहे, तसं गडचिरोलीही आपलं घर आहे. या घरात, परिवारात आपलं नेहमीच स्वागत होईल,’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले .
कार्यक्रमासाठी प्राचार्य बी. व्ही. निकम, श्रीकृष्ण गोसावी, पी. पी. माने, जे. एन. माने, मुख्याध्यापक डी. व्ही. जगताप, पी. पी. वावरे, कार्यशाळा समन्वयक अच्युत माने, अजित कदम, विविध संस्थाचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिक्षक, पालक, शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिंनी उपस्थित होते.
प्रा. सुनंदा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य पी.पी. माने यांनी आभार मानले. (वार्ताहर)