धार्मिक भोंदूगिरीपासून समाजाने सावध राहावे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 11:15 PM2016-01-10T23:15:43+5:302016-01-11T00:43:30+5:30
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी घेतलेला समाजपरिवर्तनाचा ध्यास माणसांची मते, विचार बदलल्याशिवाय राहणार नाही,
कवठेमहांकाळ : माणसांनी श्रद्धा जरूर बाळगावी, परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. अन्यथा आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन देवाच्या अन् धर्माच्या नावावर काही भोंदूगिरी करणारे पिळवणूक करतील. अशा भोंदूंपासून समाजाने सावध राहावे. शासनाने उचललेले हे विचारपरिवर्तनाचे पाऊल स्तुत्य असून, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी घेतलेला समाजपरिवर्तनाचा ध्यास माणसांची मते, विचार बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मत जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग समाज कल्याण आयुक्तालयाच्यावतीने ‘जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘एक रात्र स्मशानात’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. सुमनताई पाटील उपस्थित होत्या.सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाहीन शेख व त्यांच्या पथकाने सामाजिक प्रबोधनाची गीते, तसेच जादूटोणा व चमत्काराचे प्रयोग सादर केले.
यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देण्याची ग्वाही घोरपडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, कवठेमहांकाळच्या स्मशानभूमीतला हा दिवस ऐतिहासिक असून, येथील कार्यक्रम हा महाराष्ट्राला, देशाला एका नवविचाराची दिशा देईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमावेळी सहायक समाजकल्याण अधिकारी देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, जत विभागीय पोलीस अधिकारी नवनाथ वाकुंडे, तहसीलदार सचिन डोंगरे, बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच सुनील माळी यांनी, तर प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी नामदेवराव करगणे, सभापती वैशाली पाटील, प्राचार्य डॉ. अशोक बाबर, प्रा. दादासाहेब ढेरे, बाळासाहेब गुरव, मनोज सगरे, चंद्रकांत सगरे, दिलीप पाटील, हायूम सावनूरकर, भाऊसाहेब पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रबोधनाला सहकार्य : सुमनताई पाटील
आ. सुमनताई म्हणाल्या, आबा हे नेहमीच पुरोगामी विचारांचे समर्थन करायचे. भोंदूगिरीला, बुवाबाजीला ते विरोध करायचे. आपणही अशा प्रवृत्ती, प्रथेविरोधी असून, शासनाने असे विचारपरिवर्तनाचे, समाजपरिवर्तनाचे, प्रबोधनपर कार्यक्रम प्रत्येक गावोगावी घ्यावेत. अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमांना आपण कायम सहकार्याचे धोरण स्वीकारू.
परिवर्तनशील स्वागत..
या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीच्यावतीने एक रोप, गुलाबपुष्प आणि पुस्तक भेट देऊन करण्यात आले.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आपल्या संपूर्ण कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच महिलांची मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती. गर्दी अधिक झाल्याने बाहेर स्क्रिनवर कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली होती.ं
शासनपातळीवरूनही विज्ञानवाद रूजवण्यासाठी व अंधश्रद्धेला गाडण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार