दूर सणासाठी मातीचे बैलं सज्ज, खटावमधील कुंभारवाड्यातील चित्र
By admin | Published: June 10, 2017 01:59 PM2017-06-10T13:59:19+5:302017-06-10T13:59:19+5:30
काम अंतिम टप्प्यात; महिला पुरुषांसह लहान मुले कामात व्यस्त
आॅनलाईन लोकमत
खटाव (सातारा), दि. १0 : बैलपोळ्याचा सण अर्थात बेंदूर जवळ आल्यामुळे ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात मातीचे बैलं तयार करण्याची लगबग तसेच बैलं तयार करण्याची काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
बेंदूर सणाला शेतकऱ्यांबरोबरच सर्वांनाच फार महत्त्वाचे स्थान आहे. बेंदूर हा सण आता जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात बैलं तयार करण्याच्या कामास आता वेग आला आहे. मातीच्या बैलांबरोबरच गेल्या दोन-तीन वर्षांपासून मातीचे नावीन्यपूर्ण आकर्षक रंगीत बैलं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. हौशी ग्राहक रंगकाम केलेले बैलं जादा किंमत देऊन ते विकत घेत असल्यामुळे तेही बनवण्याचे काम सुरू आहे. कुंभारवाड्यात आता महिला, पुरुष मंडळींसह लहान मुलेही बैलं तयार करण्याच्या कामात हातभार लावताना दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात आजही बैते पद्धत असल्यामुळे बेंदूर सणाच्या एक दिवस आधी गावातील कुभार परंपरेने ठरवून घेतलेल्या कुटुंबांना पूजन करण्यासाठी मातीचे बैलं देऊन त्या बदल्यात पैसे अथवा धान्य घेत असतात. त्याचबरोबर याच सणाच्या दिवशी गावातील मातंग समाजातील कुटुंबाकडून आंब्याच्या पानाचे तोरण तयार करून ते घराला बांधण्याची परंपराही आजही ग्रामीण भागात सुरू आहे. या तोरण बांधणाऱ्या लोकांना त्या बदल्यात पुरपोळ्या तसेच धान्य देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गावोगावी मातंग समाजात बेंदूर सणासाठी तोरण तयार करण्याचेही काम सुरू आहे. आपल्या ढवळ्यापोवळ्याची पूजा करण्यासाठीची बळीराजाही आतुरतेने या दिवसाची वाट पाहाताना दिसून येत आहे.