घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची चळवळ; साताऱ्यातील २१ गावांना साडे पाच कोटी
By नितीन काळेल | Published: October 14, 2023 07:11 PM2023-10-14T19:11:05+5:302023-10-14T19:11:35+5:30
कऱ्हाडमधील सर्वाधिक ९ ग्रामपंचायतींचा समावेश
सातारा : स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यपूर्ण गावासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात सात तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींना ५ कोटी ५६ लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. यातील सर्वाधिक ९ गावे ही कऱ्हाड तालुक्यातील आहेत. या कार्यारंभ आदेशाने लवकर कामे मार्गी लागून पूर्णत्वास जाणार आहेत.
घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या सर्वत्रच आहे. याबाबत शासनस्तरावरुन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे याबाबत गावागावांत जनजागृती होत चालली आहे. सातारा जिल्ह्यात तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पध्दतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नही करण्यात येतात. आता सात तालुक्यातील २१ गावांना व्यवस्थापनासाठी साडे पाच कोटी निधीचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने मोठ्या आसलेल्या कऱ्हाड तालुक्यातील काळगाव, उंडाळे, दुशेरे, रेठरे खुर्द, वहागाव, कोडोली, रेठरे बुद्रुक, विरवडे, इंदोली या गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच फलटण तालुक्यातील विडणी, खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड व सिद्धेश्वर कुरोली तर माण तालुक्यातील पळशी, गोंदवले बुद्रुक. सातारा तालुक्यातील अतित, खोजेवाडी, जकातवाडी, त्याचबरोबर पाटण तालुक्यातील ढोरोशी, विहे आणि जावळी तालुक्यातील कुडाळ या ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या निधीतून गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे केली जाणार आहेत. घनकचऱ्यासाठी नॅडेफ व गांडुळ खत प्रकल्पाद्वारे खत निर्मितीही केली जाणार आहे. तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, लिच पिट, रिड बेड, रुट झोन प्रक्रिया केली जाणार आहे. तर स्वच्छ सुंदर व आरोग्यपूर्ण गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. आता ग्रामपंचायतींना ही कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवावे लागणार आहे. ओला व सुका कचरा कुटुंबपातळीवरच वर्गीकरण करावे लागेल. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात होईल. सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणीस्त्रोतांचे प्रदूषणही थांबले जाणार आहे.
जिल्ह्यातील १७३८ पैकी ९४४ गावांची घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या काही ग्रामपंचायतींची कामे सुरु आहेत. त्यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थानाची सर्व कामे आक्टोंबर महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच ग्रामपंचायतींनीही सर्व कामे चांगला दर्जा आणि गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी