एकांकिता, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन... रश्मी साळवीचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:30 PM2020-03-12T18:30:18+5:302020-03-12T18:31:19+5:30
नाटक, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम करत असताना घरातूनही तेवढीच मोकळीक मिळणे आवश्यक असते. यामध्ये आई-वडिलांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. तर भाऊ राहुलचेही चांगले सहकार्य लाभत गेले. - रश्मी साळवी, अभिनेत्री
सातारा : साताऱ्याच्या भूमीतून असंख्य कलाकार घडले आहेत. ते आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. पण रश्मी साळवी या मात्र अपवाद ठरत आहेत. त्या सध्या एकाच वेळी नाटक, वेब सिनेमा अन् चित्रपट क्षेत्रात काम करत आहेत. हे करत असताना ‘टॉयलेट स्टोरी’ चित्रपटात भूमिका, कार्यकारी निर्माती, सौजन्य दिग्दर्शक अन् कास्टिंग डायरेटर म्हणून त्या विविध जबाबदा-या पार पाडत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या रश्मी साळवी यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : आपण या क्षेत्रात कसा प्रवेश केला?
उत्तर : माझे शिक्षण वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंत झाले आहे. हे करत असताना मला वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेण्याची आवड निर्माण झाली. त्यातून स्टेज डेअरिंग आले. मीडियात काम करण्याचे स्वप्न होते. त्यानंतर एकांकिकांमध्ये काम करू लागले अन् हळूहळू नाटक, चित्रपटातही काम करू लागले.
प्रश्न : नाटकांविषयी आपला अनुभव कसा आहे?
उत्तर : ‘गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची’ या नाटकातून २०१३ मध्ये नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. या नाटकांतील भूमिकांना रसिकांनी उचलून धरल्याने एकापाठोपाठ एका नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. अन् ती तितक्याच ताकतीने निभावलीही. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये नाटकांचे प्रयोग झाले आहेत. ‘गावकथा’ नाटकात लहान मुलगी, तरुणी, प्रौढ महिला अन् आजीबाईची अशा भूमिका साकारल्या आहेत.
प्रश्न : महिला म्हणून काम करताना कसा अनुभव येतो?
उत्तर : नाटक, चित्रपट क्षेत्र विचित्र आहे, असा गैरसमज आहे. नाटकांच्या दौºयाच्या निमित्ताने बाहेर प्रवास करावा लागतो; पण मला सर्वच बाबतीत चांगला अनुभव आला. आपण कसे वागतो यावर समोरचे वागत असतात. त्यामुळे महिला म्हणून एक वेगळी वागणूक न मिळता कलाकार म्हणून मिळत गेली.
‘टॉयलेट स्टोरी’त लागणार कस
एखाद्या चित्रपटात काम करणं वेगळं; पण ‘टॉयलेट स्टोरी’मध्ये विविध भूमिका पार पाडाव्या लागत आहेत. यामध्ये त्यांच्याकडे एक महत्त्वाची भूमिका आहेच. त्याचबरोबर कार्यकारी निर्माती, सौजन्य दिग्दर्शक अन् कास्टिंग डायरेस्टर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. यासाठी सातारा, पुण्यात चित्रीकरण केले जात आहे.
नाटकात भूमिका
सौजन्याची ऐशी तैशी, नाथ हा माझा, यंदा कर्तव्य आहे, गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची, विच्छा माझी पुरी करा, गर्जले सह्याद्रीचे कडे, द आय व्हिटनेस, गावकथा, घरटे जिव्हाळ्याचे (दिग्दर्शन), एका शेवटाची सुरुवात (लेखन आणि दिग्दर्शन) केले आहे.