माथणेवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:40 AM2021-04-02T04:40:55+5:302021-04-02T04:40:55+5:30
चाफळ : विभागातील जुन्या माथणेवाडी गावासाठी जिल्हा परिषद शेष फंडातून गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी माजी शिक्षण सभापती यांनी पाच ...
चाफळ : विभागातील जुन्या माथणेवाडी गावासाठी जिल्हा परिषद शेष फंडातून गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी माजी शिक्षण सभापती यांनी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. या मंजूर केलेल्या निधीअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. माथणेवाडी ग्रामस्थांची रस्त्याची परवड थांबल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चाफळच्या उत्तरेस उत्तरमांड प्रकल्पानजीक माथणेवाडी गाव आहे. उत्तरमांड धरणात बाधित ठरलेल्या या गावाचे नजीकच पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाचे घोंगडे आजही शासनदरबारी भिजत पडल्याने ‘आधे इधर आधे उधर...’ अशी येथील ग्रामस्थांची अवस्था होऊन बसली आहे. काही कुटुंबे पुनर्वसित गावठाणात राहण्यास गेली आहेत, तर बरेचजण आजही जुन्या गावठाणात राहत आहेत. जोपर्यंत शासन प्रलंबित प्रश्न मार्गी लावत नाही, तोपर्यंत धरणात शंभर टक्के पाणी अडविण्यास विरोध करत, जुने गावठाण न सोडण्याचा पवित्रा येथील जनतेने घेतला आहे. शासनाच्या या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत मात्र येथील सर्वसामान्य जनता भरडली जाऊन गावाचा विकास खुंटत चालला होता. येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी पवार यांनी, काय काम हवे, अशी विचारणा करत अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी तत्काळ निधी देऊ केला होता. आज हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.