आमदारकीचे स्वप्न बाळगून काही बहुरुपी फिरताहेत : शिवेंद्रसिंहराजेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:51 PM2018-03-06T22:51:17+5:302018-03-06T22:51:17+5:30
सातारा : ‘साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटातील जनतेची मते निर्णायक असतात. माझ्या विजयातही या गटाचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, निवडणूक आली की काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बहुरुप्यासारखे सैरावैरा धावतात.
सातारा : ‘साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटातील जनतेची मते निर्णायक असतात. माझ्या विजयातही या गटाचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, निवडणूक आली की काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बहुरुप्यासारखे सैरावैरा धावतात. काही बहुरुपी मात्र आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून फिरू लागले आहेत. अशा बहुरुप्यांना जनता कधीही भुलणार नाही,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता टीका केली.
लिंब येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन, गावाअंतर्गत डांबरीकरण, भैरवनाथ आळी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, बौद्धवस्ती येथे अंतर्गत गटार, काँक्रिटीकरण, पाणी टाकी व पाईपलाईन करणे आदी विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, प्रतीक कदम, कमल जाधव, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, दयानंद उघडे, छाया कुंभार, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, गणपतराव शिंदे, धनंजय शेडगे, राजेंद्र शेडगे, सरपंच विद्या सावंत उपस्थित होत्या.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘भाजपचे सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून, केवळ राजकारणापोटी सहकारी बँका अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. या सरकराने साताऱ्यासह पुणे, नगर यासह अन्य जिल्हा बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेवर अटकाव आणला आहे. तसेच साखरेचे दर तीन हजारांपेक्षा कमी केल्याने साखर उद्योगही अडचणीत आणला आहे.
साखर कारखान्याबाबत हे सरकार योग्य निर्णय घेत नाही. वास्तविक डिसेंबरमध्ये निर्णय घेणे आवश्यक असताना आजअखेर सरकारने निर्णय घेतला नसल्याने साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.’‘दातृत्वापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे आहे. हीच भूमिका माझी नेहमी राहिली आहे आणि पुढेही राहणार आहे. मी तुमच्यामुळेच लोकप्रतिनिधी म्हणून उभा आहे. भविष्यात आगामी निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, निवडणुकीनंतर हे बाशिंगबहाद्दर पुन्हा पाच वर्षांनंतरच दिसतील. माझ्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल तर जशास तसे उत्तर मिळेल,’ असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
जितेंद्र सावंत म्हणाले, ‘आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब गटाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. कृष्णा नदीवरील बंधारा लिंबसाठी वरदान ठरणार आहे. लोकशाहीत कायद्याचे राज्य आहे. लिंबमधील जनतेवर कोणी अन्याय केल्यास या अन्यायाच्याविरोधात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्जेराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. अनिल सोनमळे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.
अजिंक्यतारा कारखाना अडचणीतून बाहेर
साताऱ्याच्या राजकारणात लिंब गटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिबंचे वर्चस्व नेहमीच कायम आहे. याची प्रचिती सर्वांना आलीच आहे. लिंब गटातील कोट्यवधींची कामे मार्गी लावली आहेत. आजही अनेककामांचे भूमिपूजन झाले. या सर्व कामांचे श्रेय खºया अर्थाने जितेंद्र सावंत यांना आहे. कॅप्टन अण्णांमुळेच अजिंक्यतारा कारखाना अडचणीतूनबाहेर आला आहे,’ असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
लिंब, ता. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वनिता गोरे, जितेंद्र सावंत, सर्जेराव सावंत व मान्यवर उपस्थित होते.