काही राजकारण्यांचीच आत्मचरित्रे खरी!
By admin | Published: December 6, 2015 12:01 AM2015-12-06T00:01:35+5:302015-12-06T00:02:58+5:30
परिसंवादातील सूर : मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना
सातारा (प्रा. एम. एम. कलबुर्गी व्यासपीठ) : शाहूकला मंदिर येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आयोजित खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृषी जागरसाठी घेण्यात आलेल्या दुसऱ्या सातारा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारण्यांची आत्मचरित्रे किती खरी किती खोटी’ या विषयावर परिसंवाद झाला. यात ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, विश्वास दांडेकर, किशोर बेडकिहाळ सहभागी झाले होते. परिसंवादाचे प्रा. मिलिंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण्यांची आत्मचरित्रे म्हणजे काही खरं काही खोटं असे म्हणायला हवे, असा सूर परिसंवादात व्यक्त झाला.
प्रारंभी संयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्तविकात संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी राजकारण्यांच्या आत्मचरित्रात सोयीची गोष्टी लिहिल्या जातात, त्यात वस्तुनिष्ठता कमी आणि सत्य टाळले जात असावे, असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी अरविंद गोखले, विश्वास दांडेकर, किशोर बेडकिहाळ यांना यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर मान्यवरांनी विविध संदर्भ आणि उदाहरण सांगत उपस्थितांना एकप्रकारे ऐतिहासिक ठेवाच उपलब्ध करून दिला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले म्हणाले, ‘साहित्यिक राजकारणी असतील तर ते आत्मचरित्र लिहू शकतात; परंतु अलीकडे ही परंपरा लोप पावत चालली आहे. यापूर्वीच्या अनेक राजकीय व्यक्तींची आत्मचरित्रे आली त्यात त्यांनी खरे लिहावे खोटे लिहू नये, अशी अपेक्षा असते; परंतु तसे होत नाही, असे सांगितले.
किशोर बेडकिहाळ यांनी समाजाच्या मानसिकतेत बदल झाल्याने राजकारणी आणि सेलिब्रिटीबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. राजकारणावर चर्चा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. राजकारणांची आत्मचरित्रे ही सामाजिक अभ्यासासाठी उपयोगी ठरू शकतात; परंतु अलीकडच्या चरित्रामध्ये विश्वास ठेवावा, असे लिखाण झालेले दिसत नाही. राजकारण्यांचा व्यवहारही वस्तुनिष्ठ राहिला नाही, असे सांगितले. विश्वास दांडेकर यांनी विविध राजकारण्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे त्यातील बारकावे, काही प्रसंग, परदेशातील राजकारण्यांची चरित्रे, त्यातील बारकावे, तिथली राजकारणी आणि आपल्यातील राजकारण्यांच्या लिखाणामध्ये असलेले फरक, पूर्वीच्या राजकारण्यांनी लिहिल्यानंतर निर्माण झालेले प्रसंग त्याला त्यांनी दिलेले तोंड हे उदाहरणासह सांगून उपस्थितांना एक मोठा ठेवाच दिला.
सर्वच मान्यवरांनी महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, महंमद अली जीना, लालकृष्ण आडवणी, जयराम रमेश, नटवरसिंग, कुलदीप नय्यर, परवेझ मुशर्रफ, शंकरराव देव, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, मोहित सेन विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लिहिलेली आत्मचरित्रांचा उल्लेख केला. मुळात समीक्षकांनी आत्मचरित्रांना दुय्यम दर्जा दिल्याने समीक्षेचेही दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसंवादास संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रा. रं. बोराडे, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्राचार्य संभाजीराव पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, किशोर बेडकिहाळ, विश्वास दांडेकर, पुरुषोत्तम शेठ, दिनकर झिंब्रे, राज्याच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक आणि सातारकर उपस्थित होते. अजित साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)