फलटण तालुक्यातील वाखरीमधील काही ग्रामस्थ यात्रेपासून वंचित, उद्यापासून उपोषणाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:28 PM2022-04-13T16:28:55+5:302022-04-13T16:29:12+5:30
फलटण : वाखरी, ता. फलटण येथील यात्रेच्या पंचकमिटीने गावातील विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून ...
फलटण : वाखरी, ता. फलटण येथील यात्रेच्या पंचकमिटीने गावातील विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून घेण्यास नकार देऊन वाळीत टाकल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार तब्बल २० वर्षांपासून सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबत गावातील दोनशेहून अधिक नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाखरी गावातील भैरवनाथाची जत्रा दि. २३ एप्रिलपासून सुरू होणार असून पाच दिवसांची जत्रा भरते. परंतु गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ जत्रेच्या पंचकमिटीने गावातील अनेक नागरिकांची वर्गणी घेण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर यात्रेत ते सहभागी करून घेत नाहीत.
आम्ही तुमची वर्गणी घेणार नाही तसेच जत्रेत तुम्हाला सहभागी होता येणार नाही. आला तर तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा पंचकमिटी देत असल्याने गावातील ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य सरपंच उपसरपंच तसेच दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे धाव घेऊन यात्रेमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची तसेच वर्गणी पण घेण्याची विनंती केली आहे.
याबाबतचे निवेदन देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दि. १४ रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणास बसण्याचा इशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर वाखरी गावच्या सरपंच शुभांगी शिंदे, उपसरपंच अक्षय जाधव तसेच दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या साक्षऱ्या आहेत. आजच्या आधुनिक युगात जत्रेत सहभागी करून न घेण्याचा व वाळीत टाकण्याचा हा प्रकार वाखरी गावात अनेक वर्षे चालला असून प्रशासन पण वाळीत टाकण्याच्या प्रकाराबद्दल दखल घेत नसल्याबद्दल तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार
गेली वीस वर्षांहून अधिक काळ झाला. यात्रेमध्ये बहुसंख्य ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरवर्षी वर्गणी देण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करतात. मात्र यात्रा पंच कमिटी सहभागी करून घेत नाही. यावेळी सहभागी करून न घेतल्यास मानवी हक्क आयोगाकडे जत्रा कमिटी आणि प्रशासनाविरोधात तक्रार करणार आहे. शुभांगी शिंदे- सरपंच, वाखरी
चर्चा सुरू
वाखरी गावात जुनी जत्रा कमिटी आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. दोन्ही बाजूंना आम्ही समजावून सांगत आहोत. त्यांची बैठक पण घेतली आहे. नवीन जत्रा कमिटी नेमून सर्वांना सामावून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. पोलीस पण त्यांच्या पद्धतीने समजावून सांगत आहेत. - डॉ. शिवाजी जगताप, प्रांताधिकारी, फलटण