सातारा : पुत्र व्हावा ऐसा गुंडा... पळशीतील पुत्राने उभारले आई-वडिलांचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:42 PM2018-02-17T13:42:15+5:302018-02-17T14:05:58+5:30
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर बांधले असून, त्यामध्ये दोघांच्या मूर्तीची स्थापनाही केली आहे.
औंध : पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर बांधले असून, त्यामध्ये दोघांच्या मूर्तीची स्थापनाही केली आहे.
खटाव तालुक्यातील पळशी हे गाव वडूज-कऱ्हाड रस्त्यावर असून, गावापासून काही अंतरावर जाधव वस्ती आहे. सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांच्या आई बकुळाबाई जाधव यांचे फेब्रुवारी २०१२ रोजी निधन झाले. तर महिन्यानंतर वडील गणपत जाधव यांनीही जगाचा निरोप घेतला. दोघांच्या निधनाने जाधव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या दाम्पत्याला चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे. बाळू जाधव हे भावंडांमध्ये सर्वात लहान.
काबाडकष्ट करून आपल्याला लहानाचे मोठे करणाऱ्या व कुटुंबासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आई-वडिलांची आठवण कायम तेवत राहावी यासाठी काहीतरी करावे, अशी कल्पना बाळू जाधव यांच्या मनात आली. त्यानुसार त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मंदिराच्या प्रत्यक्ष कामास त्यांनी २०१२ रोजी सुरुवात केली व दोघांच्या वर्षश्राद्धावेळी मंदिर पूर्ण केले. आजपर्यंत त्यांनी मंदिरास तब्बल दहा लाख रुपये एवढा खर्च केला आहे. किरकोळ काम वगळता मंदिर पूर्णत्वास आले आहे. जवळपास दहा गुंठे क्षेत्रात हे मंदिर उभारण्यात आले आहे.
मंदिराच्या परिसरात फुलझाडे फुलविण्याचा बाळू जाधव यांचा मानस आहे. अनेकजण घरातून बाहेर पडताना श्रद्धेपोटी देवदेवतांचे दर्शन घेतात. मात्र, बाळू जाधव मंदिरात स्थापन केलेल्या आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात करतात. बाळू जाधव यांनी मंदिराची उभारणी करून पुत्रप्रेमाची अनोखी महती सर्वांसमोर आणली आहे.
आई-वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, यासाठी त्यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. जीवात-जीव असेपर्यंत या मंदिराची देखभाल करणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करणार आहे.
- सोपान ऊर्फ बाळू जाधव