सरस्वतीपूजकांच्या सहवासाने झाले आयुष्याचे सोने!
By Admin | Published: February 15, 2016 11:28 PM2016-02-15T23:28:30+5:302016-02-16T00:11:48+5:30
संजीव देशमुखांचा यशस्वी प्रवास : सोलापुरातल्या मानेगावच्या मातीने केले संघर्षातून जगण्याचे संस्कार
सागर गुजर -- सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी परिश्रमाच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. आजोबांनी सरस्वतीपूजकांच्या म्हणजेच अभ्यासू माणसांच्या संगतीत कायम राहण्याचा दिलेला सल्ला देशमुखांनी कायम लक्षात ठेवला, आणि हे त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक ठरले आहे.
‘विद्या विनयेन शोभते’ या उक्तीची प्रचिती संजीव देशमुख यांच्या देहबोलीतून नेहमी पाहायला मिळते. उंच भरारी घेताना ज्या मातीतून आपण आलो, ज्या गावातून आलो व ज्या सवंगड्यांच्या सानिध्यात राहून आयुष्याला आकार दिला, त्यांना कधीच विसरायचं नाही, हे संस्कार ते कधीच विसरले नाहीत. माढा तालुक्यातील मानेगावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले संजीव देशमुख आपली आई सुरेखा आणि वडिलांना पहिले गुरु मानतात. वडील नारायण कृष्णात देशमुख (आबा), आजोबा कृष्णात प्रल्हाद देशमुख (काका) यांची कमी पाऊसमान असूनही मानेगावच्या शेतीत सोनं पिकवायची जिद्द होती. कष्टकऱ्याच्या घरात जन्मलो तरी विचारसरणी कशी उच्च ठेवायची, याचे संस्कार अशिक्षित आईने केले. पत्नी भावना यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याने त्यांना उमेदीनं काम करता येत आहे.
मानेगावच्या विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण बार्शीत केले. त्यानंतर बीएसस्सी (अॅग्री) साठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या मित्रांची संगत जडली. १९९४ मध्ये पदवी पूर्ण केली. एव्हाना एमएस्सी अॅग्रीसाठी राहुरी कृषी विद्यापीठात प्रवेश केला. कोल्हापूरचे मित्र मंडळ राहुरीतही सोबत होते. राहुरी विद्यापीठात एमएसस्सीच्या पहिल्या वर्षाला असताना वसतीगृहात राहणे व ग्रंथालयातील पुस्तकांचा अभ्यास करणे, हा नित्यनियम सुरू झाला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू असताना महाविद्यालयीन परीक्षांचे पत्रक आयोगाच्या परीक्षेच्या आधारावर बदलले जात होते. १९९५ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. योगायोग म्हणजे याच वेळी देशमुख यांच्यासह २८ सहकारी या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. याच वर्षी कृषी खात्यातील वर्ग २ ची परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. १९९६ मध्ये शासनातील अकाऊंट फायनान्स ही परीक्षा व त्यानंतर असिस्टंट लेबर आॅफिसर ही परीक्षाही त्यांनी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण केली. एका वेळी सरकारी खात्यातील चार-चार नोकऱ्या हातात असणारे देशमुख यांच्यासारखे उदाहरण अभावानेच आढळते. त्यांनी तहसीलदार पदाची नोकरी स्वीकारली.
लातूरला पहिली नेमणूक झाल्यानंतर तेथील पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी माहीम आखली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम दिले. तर २00३ मध्ये संगणीकृत सातबारे देण्याचा पहिला प्रयोग देशमुखांनी केला. मुरुड तालुक्यात मोबाईल व्हॅनमधून या प्रयोगाचे जागरण केले. महाराष्ट्रातील या पहिल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. त्यांनी या प्रयोगाबद्दल कौतुक केले. या कामगिरीच्या बळावर शासनातर्फे २00४ मध्ये मराठवाड्यातील बेस्ट तहसीलदार म्हणून गौरव करण्यात आला. विद्यार्जनाची आस धरणाऱ्यांची संगत आणि कठोर परिश्रम, हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे, असं ते सांगतात.
विलासराव देशमुख गॉडफादर
लोकसेवा आयोगाची वर्ग १ ची परीक्षा देऊन तहसीलदार झालो. स्वतंत्र व स्वच्छ कारभाराची रचनात्मक पद्धत लातूर आणि परिसरात राबविली. याच काळात मराठवाड्यातील आदर्श तहसीलदार म्हणून गौरव झाला. याकाळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व दूरदृष्टिचे नेते विलासराव देशमुख यांच्यासारखा ‘गॉडफादर’ मिळाला. प्रामाणिक व सचोटीने आपल्या संकल्पना राबविल्या की, अशी मोठी माणसे आपल्या सहज जवळ येतात, याचा अनुभव घेतला.
शिक्षणाधिकारीही थक्क झाले!
इयत्ता चौथीत शिकत असताना शाळा तपासणीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकदा मानेगावच्या प्राथमिक शाळेत आले होते. त्यांनी मला इतिहासातील एक प्रश्न विचारला त्याचे अचूक उत्तर दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर तब्बल एक तास प्रश्नांचा भडिमार केला. या प्रश्नांचीही उत्तरे दिल्यानं त्यांनी पाठीवर थाप टाकत शिक्षकांचेही कौतुक केले.