सोनके-करंजखोप ओढ्यावरील पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:14 PM2017-10-24T17:14:54+5:302017-10-24T17:19:03+5:30
सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिंपोडे बुद्रुुक, दि. २४ : सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडे असलेल्या सोनके-करंजखोप या गावांना जोडणारा तीन किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.
दरम्यान, या दोन्ही गावांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पूल परतीच्या पावसात वाहून गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. दुचाकी व इतर लहान वाहने वगळता या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
एसटीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करंजखोप ग्रामस्थांमधून होत आहे.
या पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पूरहानी अंतर्गत पंचवीस लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पुढील आठवड्यात दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल.
- संदीप धुमाळ, करंजखोप