दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:31 AM2023-07-12T11:31:55+5:302023-07-12T11:34:14+5:30
सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उप ...
सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवेत, असा ठराव मासिक सभेत करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याबाबत सोनापूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुनंदा खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनापूर ही ग्रामपंचायत ग्रुप पंचायत आहे. गावाच्या अंतर्गत निवडुंगवाडी गाव असून हे गाव सोनापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. यामध्ये सरपंच पद हे आरक्षित महिला आहे, तर उपसरपंच पदही काही महिन्यांपासून रिक्त आहे.
या रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर दोन उपसरपंच पदे निर्माण करावी, असा मासिक सभेचा ठराव करण्यात आला आहे; परंतु असा ठराव लिहिण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री पदे चालत असतील तर गावच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी गावासाठी दोन उपसरपंच पदे असावी, असे सदस्यांचे मत झाले आहे.
गावाला सुद्धा दोन उपसरपंच असतील तर गावच्या विकासास गती मिळेल. - नंदकुमार बागल, (ग्रामस्थ, सोनापूर)