सोनगाव-शेळकेवाडी पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:15+5:302021-07-30T04:40:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा - आसनगाव मार्गावरील उरमोडी नदीवर असणारा सोनगाव-शेळकेवाडी पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा - आसनगाव मार्गावरील उरमोडी नदीवर असणारा सोनगाव-शेळकेवाडी पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पुलाच्या खाली नदीचे आणि पुलावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सोनगाव-शेळकेवाडी मार्गावरील पुलाच्या निर्मितीला अनेक वर्षे झाली आहेत. पाऊस सुरू झाल्यावर या पुलावरच पावसाचे पाणी साचून राहते. त्यातच या पुलाला असणाऱ्या संरक्षक कठड्यावरील पाईपही चोरीला गेल्या आहेत. पुलावरील रस्त्यावर खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पुलावरील साचलेल्या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने जातात. पुलावर साचून राहणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच संरक्षक कठड्याचेही पाईप चोरीला गेल्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास वाहन थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता आहे.
या पुलाच्या संरक्षक कठड्यासंदर्भात येथील स्थानिकांनी तक्रार करूनही बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. या पुलाचा वापर आसनगाव परिसरातील दहा ते बारा गावांमधील लोक रहदारीसाठी करतात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फोटो : २९ सागर नावडकर
उरमोडी नदीवरील सोनगाव-शेळकेवाडी पुलावरच पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : सागर नावडकर)