सोनगाव कचरा डेपोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:22+5:302021-04-25T04:39:22+5:30
शेंद्रे : सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोला शनिवारी दुपारी आग लागली. आगीमुळे कचरा डेपो परिसराबरोबर सोनगाव व जकातवाडी ...
शेंद्रे : सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोला शनिवारी दुपारी आग लागली. आगीमुळे कचरा डेपो परिसराबरोबर सोनगाव व जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुपारी लागलेल्या आगीने सायंकाळी जास्त पेट घेतला. त्यामुळे सायंकाळनंतर डेपोत आगीने रौद्र रूप घेतले होते.
मागील आठवड्यातही डेपोला आग लागली होती; परंतु यावर नियंत्रण मिळविण्यात सातारा नगरपालिकेला यश आले होते.
या कचरा डेपोतील निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुराचे प्रमाण इतके होते की, शेजारीच असणारा अजिंक्यतारा डोंगरही दिसेनासा झाला होता. या कचरा डेपोपासून बोगदा-शेंद्रे हा रस्ता जात असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कचरा डेपोतून निघणार्या धुरामुळे वाहनधारकांना समोरील येणारी वाहनेही दिसत नव्हती.
या कचरा डेपोच्या नेहमीच्या आगीमुळे परिसरातील ग्रामस्थांत कमालीचा संताप आहे. सोनगाव व जकातवाडी या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या विरोधात आंदोलन करण्याची तयारी करीत आहेत. वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांत तीव्र संतापाची भावना आहे.
चौकट.
... अन्यथा कचरा टाकू देणार नाही
कचरा डेपोतील आगीमुळे शनिवारी परिसरात धुराचे साम्राज्य झाले आहे. या धुरामुळे स्थानिक ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कचरा डेपोला आग लागणे हे नेहमीच होत असते. सातारा नगरपालिकेने याची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा जकातवाडी ग्रामस्थ कचरा डेपोत कचरा टाकू देणार नाहीत, असा इशारा जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस यांनी दिला आहे.
फोटो सागर नावडकर यांनी पाठविला आहे.
सातारा नगरपालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोला शनिवारी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. (छाया : सागर नावडकर)