इटीआय मशीन बंद पडताच वाहक देताहेत कोऱ्या कागदावर तिकीट लिहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:56+5:302021-03-05T04:38:56+5:30
सातारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळात इलेक्ट्रीक मशीनमधून तिकीट मिळू लागले तेव्हा सर्वांना अप्रूप होते. पण, आता वाहकांसाठी हीच ...
सातारा : राज्य मार्ग परिवहन महामंडळात इलेक्ट्रीक मशीनमधून तिकीट मिळू लागले तेव्हा सर्वांना अप्रूप होते. पण, आता वाहकांसाठी हीच मशीन डोकेदुखी ठरत आहेत. मशीनची बॅटरी अचानक डाऊन होणे, मशीन हँग होणे, तिकीट न निघणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अचानक तपासणीत सापडल्यानंतर कारवाई तर होणार नाही ना, ही चिंता सतावत आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील वाहकांना देण्यात येत असलेल्या बहुतांश मशीनमध्ये बिघाड होत असल्याचा अनुभव आहे. आगारात मशीन दिली जाते तेव्हा बॅटरी शंभर टक्के चॅर्जिंग झालेले असते. पण, दोन-चार तिकीट काढताच ती उतरण्यास सुरुवात होते. अन् वीस-पंचवीस प्रवासी असतील तर हँग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोऱ्या कागदावरच पेनाने लिहून तिकीट द्यावे लागत आहे.
११ जिल्ह्यातील आगारांची संख्या
५०० एसटी बसेसची एकूण संख्या
१३६० वाहकांची संख्या
एकासाठी सात वेळा
विद्यार्थी पास असलेल्यांना तिकीट द्यायचे असल्यास वाहकाला तिकीट काढण्यासाठी सात ते आठ वेळा बटन दाबावे लागते.
या आहेत तक्रारी
n मशीन वाहकाच्या ताब्यात मिळते तेव्हा ती शंभर टक्के चार्ज झालेली असते. मात्र, दोन - चार तिकीट काढल्यानंतर निम्म्यावर येते. सलग वीस - पंचवीस तिकिटे असल्यास हॅंग होतात.
n लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जाणाऱ्या वाहकांना अनेक ठिकाणी चार्जिंगची सोय नसते. अशावेळी जेवणासाठी थांबलेल्या हॉटेलमध्ये चार्जिंगला लावावे लागतात. त्यामुळे एस. टी.तच चार्जरची सोय करण्याची गरज आहे.
n एस. टी.च्या फेऱ्या चोवीस तास सुरू असतात. एखादी मशीन रात्री बंद पडली तर संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ मिळत नाहीत. ते सकाळी दहानंतर येतात. तक्रार पुस्तकात नोंद केली तरी दुरूस्त होतात का, याबाबत शंका आहे.
वाहक म्हणतात.
तिकीट काढण्याच्या मशीनच्या बॅटरी डाऊन होणे, तिकीट बाहेर न येणे, मात्र मशीनमध्ये नोंदविले जातात. त्यामुळे काम करताना अडचणी येतात.
- संतोष संकपाळ, वाहक, सातारा.
मुंबईतील बेस्ट, पुण्यातील पीसीएमटीमधील मशीन चांगल्या गुणवत्तेच्या आहेत. तीन सेकंदात तिकीट मिळते. एस. टी.त मात्र खूप वेळ वाया जातो.
- विशाल गोसावी, वाहक.
तिकीट तपासणी पथकाकडून गाडीची तपासणी होते. तेव्हा मशीन बंद पडलेले असल्यास खात्री केली जाते. नैसर्गिक न्याय तत्त्वावर ही तपासणी असते. काही गोंधळ खराच असल्याचे लक्षात आल्यावर कारवाई होते.
- ज्योती गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा.
वेळ प्रसंगी जुन्या पद्धतीची तिकिटे द्यावीत
एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाला जुन्या पद्धतीच्या कागदी तिकिटांचा ट्रेही सोबत दिलेला असतो. वेळप्रसंगी मशीनमध्ये अडचण आलीच तर जुन्या तिकिटांचा वापर करणे हे नियमाला धरूनच आहे. त्यामुळे कारवाई होण्याची भीतीही नसते. त्यासाठी आळस मात्र करू नये.
- ज्ञानेश्वर ढोमे, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना, सातारा.