एसटीतून खाली उतरताच हाती पडले गुलाब!
By Admin | Published: February 14, 2016 09:50 PM2016-02-14T21:50:30+5:302016-02-15T01:16:27+5:30
कऱ्हाड आगारात प्रवासी दिन : २४ प्रवासी, २६ चालक-वाहकांना दिले गुलाबपुष्प; अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’
कऱ्हाड : दिवसभर बसमधून प्रवास करून दमलेल्या व कंटाळलेल्या प्रवासी व वाहनचालक-वाहकांच्या हाती गाडीतून खाली उरताच हाती गुलाबपुष्प पडल्याचा अनुभव रविवारी त्यांना कऱ्हाड आगारात आला. चक्क कऱ्हाड आगार व्यवस्थापक व प्रवासी महासंघातील पदाधिकाऱ्यांकडून प्रवासी, वाहनचालक-वाहकांना गुलाबपुष्पे देण्यात आली. सुरुवातीला आगारात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो आहे का?, असे सर्वांना वाटू लागले; मात्र निमित्त होते ते प्रवासी दिनाचे. या दिनाचे औचित्य साधून कऱ्हाड आगार व्यवस्थापन व जिल्हा प्रवासी महासंघातर्फे प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी २४ प्रवासी व २६ चालक-वाहकांना गुलाबपुष्प देण्यात आले.यावेळी जिल्हा प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भीमराव शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र माने, माधव मोटे, नारायण जाधव, सदाशिव खटावकर, महादेव पुजारी, विवेक ढापरे, हिंदुराव पाटील, कऱ्हाड वाहतूक नियंत्रक श्रीराम वीर, वाहतूक नियंत्रक पठाण, कऱ्हाड आगार इनचार्ज विजय कालेकर, शकील नदाफ, अविनाश थोरात आदींंची उपस्थिती होती.
दरवर्षी रथसप्तमीदिनी कऱ्हाड आगाराकडून प्रवासी दिन साजरा केला जातो. यावर्षीही मोठ्या उत्साहात आगारात प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन प्रवासी दिनाचे व एसटीतून प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रवासी गाडीतून खाली उतरला की, त्यांच्या हातात गुलाबपुष्प देण्यात आल्यावर प्रवासी ही आश्चर्यचकीत होत होते. इतरवेळी गाडी वेळेवर न सोडत असलेल्या तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या आगार व्यवस्थापनाकडून गुलाबपुष्प देऊन आपला सत्कार केला जात असल्याने प्रवासीही भारावून जात होते. तर दुसरीकडे आपल्या नोकरीमध्ये उत्कृष्ठपणे सेवा बजावल्याबद्दल व विनाअपघात सेवा केल्याबद्दल २६ चालक-वाहकांना गुलाबपुष्प देण्यात आले.यावेळी एच. आर. पाटील, ए. डब्लू जमाले, बसस्थानक अधिकारी विठ्ठल खाडे, चालक कांबळे, एस. एम. पवार, एम. जी. शिंदे, सुरेश कांबळे, एन. एम. शेख, नंदा पवार, कळंबेकर, अमित जाधव, राहुल शेवाळे, अनिल लटके, सूर्यकांत जाधव, मुराद मुजावर, अनिल सावंत आदी एसटी चालक-वाहकांना उत्कृष्ठ सेवा पार पाडत असल्याबाबत गुलाबपुष्प देण्यात आले.कऱ्हाड आगार व्यवस्थापनातील अधिकारी व प्रवासी महासंघातील पदाधिकाऱ्यांकडून जो भेटेल त्याला हाक मारून गुलाबपुष्प देण्यात येत होते. १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणूनच साजरा केला जातो एवढेच माहीत असणाऱ्या महाविद्यलायीन विद्यार्थ्यांना आज पहिल्यांदा १४ फेबु्रवारी हा ‘प्रवासी दिन’ही साजरा केला जातो हे समजले.
प्रवासी, वाहनचालक व वाहकांना देण्यात आलेल्या गुलाबपुष्पामुळे आगार व्यवस्थापनाने असे चांगले उपक्रम नियमित घेऊन प्रवासी, वाहनचालक, वाहक यांच्यात चांगले नाते निर्माण करावे, अशा प्रतिक्रिया यावेळी प्रवासी व वाहनचालकांनी दिल्या. (प्रतिनिधी)
कऱ्हाड आगार व्यवस्थापनाकडून आज विनाअपघात उत्कृष्ठपणे सेवा बजावित असल्या बाबत गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे प्रवाशांशी चांगल्या पद्धतीने वागून काम करत आहे. आज आमचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केल्यामुळे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची आम्हाला पोचपावती मिळाली आहे.
- शिवाजी पवार, चालक, चचेगाव, ता. कऱ्हाड
प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य...१४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. एवढे माहीत असणाऱ्या आगारातील महाविद्यलायतीन विद्यार्थी व प्रवाशांना आज ‘प्रवासी दिन’ साजरा केला जातो, हे पहिल्यांदाचा माहिती झाले. उत्कृष्ठ, विनाअपघात सेवा करणाऱ्या व प्रवाशांची आपुलकीने वागणाऱ्या चालक-वाहकांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येत होतो. एवढेच नव्हे तर एसटीतून खाली उतरणाऱ्या प्रवाशांनाही गुलाबपुष्प देण्यात येत होते. अशा प्रकारे कऱ्हाड आगार व्यवस्थापनाने अनोख्या पद्धतीने रविवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.