सायरन वाजताच नागरिकांची होतेय पळताभुई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:39 AM2021-05-09T04:39:58+5:302021-05-09T04:39:58+5:30
तरडगाव : साधारण सकाळी नऊची वेळ... लोणंद पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीचा सायरन वाजताच तरडगाव बसस्थानक येथे गर्दी करून थांबलेल्या ...
तरडगाव : साधारण सकाळी नऊची वेळ... लोणंद पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीचा सायरन वाजताच तरडगाव बसस्थानक येथे गर्दी करून थांबलेल्या नागरिकांनी एकच धूम ठोकली. पोलिसांना सापडू नये म्हणून दिसेल त्या रस्त्याने नागरिक पळताना दिसले. गावातून फेरफटका मारून गाडी पुन्हा बसस्थानक येथे थांबली असता गावच्या स्वागत कमानीतून ये -जा करणाऱ्या काही दुचाकीस्वारांची चौकशी करीत सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी विनाकारण फिरताना आढल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे खडसावून सांगितले.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या थोडीशी कमी होताना दिसत असली तरी विशेषतः ग्रामीण भागात ती वाढून मृत्यूच्या प्रमाणाचा आकडादेखील वाढत आहे. यामुळे अनेक गावे ही प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केली असतानादेखील नागरिक शासन नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.
शनिवारी सकाळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार अविनाश शिंदे यांनी तरडगाव बसस्थानक परिसरात एन्ट्री करताच गर्दी करून थांबलेल्या नागरिकांची पळताभुई थोडी झाली. वाट दिसेल तिकडे नागरिक सैरावैरा पळाले. काही ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली, तर त्यातील काहींच्या गाडीच्या चाव्या ताब्यात घेतल्या.
दुचाकीस्वारांना समज देताना विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तरडगाव प्रवेशद्वार हे ये-जा करणाऱ्यांसाठी बंद करण्यात आले. बंदोबस्तासाठी येथे नेमलेल्या होमगार्डला ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी मदतीसाठी द्या, काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, अशा सूचना विशाल वायकर यांनी दिल्या.
(चौकट)
नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित...
बंदोबस्तासाठी येथील बसस्थानक येथे होमगार्ड आहेत. मात्र, काही नागरिक त्यांना न जुमानता ये-जा व गर्दी करतात. कित्येकदा गावातील विविध चौकांत अनेक तरुण हे विनाकारण गप्पा मारताना बसलेले दिसतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो. बाधित संख्या आटोक्यात राहण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
०८तरडगाव
फोटो - तरडगाव (ता. फलटण) येथे विशाल वायकर यांनी गावातून फेरफटका मारत बसस्थानक येथे दुचाकीस्वारांची चौकशी करीत समज दिली.
(छाया : सचिन गायकवाड).