माणपूर्व भागातील ज्वारीची पिके जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:04 AM2021-02-05T09:04:59+5:302021-02-05T09:04:59+5:30
वरकुटे-मलवडी : सहा वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात यंदा बहरलेल्या ज्वारीच्या पिकांंमुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या ...
वरकुटे-मलवडी : सहा वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर माण तालुक्यात यंदा बहरलेल्या ज्वारीच्या पिकांंमुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे माण तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी सर्वच पिके बहरात आलेली आहेत. मागील सहा ते सात वर्षांच्या तुलनेत भूगर्भात यावर्षी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
तालुक्यातील विहिरी आणि काही ठिकाणच्या ओढ्या-नाल्यातून अजूनही पाणी वाहत आहे. यामुळे माण तालुक्यातील पूर्वेकडील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी, जांभुळणी, वळई, पानवन, शिरताव, देवापूर आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल असल्याने सध्या ज्वारीसह रब्बी हंगामातील इतर पिकांची वाढ ही जोमात झाली आहे. सध्या ज्वारीचे पीक निसवून कणसे बाहेर पडू लागल्याने टचटचीत हुरडा भरलेल्या कणसांचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा वावर वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत तर शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा ही पिके हिरवीगार व जोमदार असून हरभराही फुलोऱ्यात आला आहे तर ज्वारी हुरड्याला आली आहेे.
फोटो : वरकुटे-मलवडी येथील समीर इनामदार यांच्या शेतात बहरलेले ज्वारीचे पीक.