दूध संघामार्फत मुरघास प्रकल्प उभारणार - शंकरराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:05+5:302021-04-10T04:38:05+5:30
रामापूर : पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून, त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दूध संघामार्फत ...
रामापूर : पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून, त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दूध संघामार्फत विविध उपक्रम, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा सर्वतोपरी फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांना झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून दूध संघाला स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ मिळाला असून, संघ प्रगतीपथावर आहे. भविष्यात अत्याधुनिक मशिनरीद्वारे मुरघास प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव यांनी बैठकीत बोलताना दिली.
सोनगाव (ता. पाटण) येथील पाटण तालुका दूध उत्पादक संघाची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविडच्या नियमांचे पालन करून पार पडली. यावेळी जाधव बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण अर्बन बॅंकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, उपाध्यक्ष शांताराम सूर्यवंशी, संचालक आबासाहेब शिंदे, विठ्ठल लांबोर, रघुनाथ दंडिले, अशोकराव मोरे, विकास शिलवंत, आकाताई काळे, आप्पासाहेब मोळावडे, सुंदर पुजारी उपस्थित होते.
शंकरराव जाधव पुढे म्हणाले की, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक संघ यशस्वीपणे वाटचाल करत आहे. पाटण तालुका दूध संघाने सन २०१९ - २०मध्ये ५३ लाख ३६ हजार ३९३ लीटर एकूण दूध संकलन केले आहे. संघाला निव्वळ नफा चार लाख इतका झाला आहे. दूध संस्थांना व दूध उत्पादकांना प्रतिलीटर १.२५ रुपये दूध दर फरकाची तरतूद केली असून, सेवकांना बोनस ३० टक्केप्रमाणे १२ लाख ५६ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांना संघाला दूध पुरवठा केलेल्या दुधावर प्रतिलीटर १० पैसेप्रमाणे ऑडिट फी रक्कम रुपये २.२१ लाखांची तरतूद केली आहे. दूध संस्थांच्या सचिवांकरिता एक पगाराएवढा बोनसही दिला जाणार आहे. दूध संस्थांना मिल्कोटेस्टर कॉम्प्युटर, कडबाकुट्टी मशीन आदीसाठी १ लाख ७५ हजारांचे अनुदान वाटप केले आहे.
व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी अहवाल वाचन केले. संघाचे संचालक सुभाषराव पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संचालक अशोकराव मोरे यांनी आभार मानले. या बैठकीला पाटण तालुका दूध उत्पादक संघाचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.