बावधनमध्ये घुमला ‘चांगभलं’चा गजर
By admin | Published: March 17, 2017 11:28 PM2017-03-17T23:28:45+5:302017-03-17T23:28:45+5:30
बगाड यात्रा उत्साहात : देशभरातील लाखो भाविकांची हजेरी; उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा
कवठे/पसरणी : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या (ता. वाई) काळभैरवनाथाची बगाड यात्रा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी भव्य यात्रा आहे. या यात्रेसाठी राज्यासह देशभरातील भाविक बावधन येथे दाखल झाले होते. होळी पौर्णिमेला भैरवनाथ मंदिरात कौल लावून यंदाचा बगाड घेण्याचा मान युवराज ठोंबरे यांना मिळाला.
ओझर्डे येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या सोनेश्वर या ठिकाणापासून बगाड यात्रेस प्रारंभ झाला. भरभक्कम व पूर्णत: लाकडी असलेला हा बगाड रथ सहा बैलजोड्यांच्या साह्याने ओढण्यात आला. ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर झाल्याबरोबर एकावेळी हे सर्व बैल आपल्या ताकदीनिशी गाडा ओढत
होते. ठराविक अंतरावर बैल
बदलून नव्या दमाच्या
बैलांच्या साह्याने सायंकाळी ६.३० च्या दरम्यान बगाडाने बावधन गावात प्रवेश केला.
सर्व स्थानिक ग्रामस्थ पांढऱ्या पोशाखात होते. बगाड गावात पोहोचताच बगाडाचे रिंगण पूर्ण
करून बगाड्यास खाली उतरवून देवाचा प्रसाद दिला गेला व
बगाड यात्रेची सांगता करण्यात
आली. (वार्ताहर)
रथाला दोन दगडी चाके; ४० फुटांचे शीड
सुमारे तीनशे वर्षांपासून बगाड प्रथा सुरू आहे. गावातील थोरल्या विहिरीत पाण्याखाली असलेले बगाड साहित्य बाहेर काढून त्यापासून बगाड गाडा तयार केला जातो. या रथाची दोन दगडी चाके १० फूट लांब लाकडी कण्याने जोडली जातात. यावर लाकडी वाघल्या वसवून त्यावर मधोमध १८ फूट उंच कण्यास ४० फूट लांबीच्या कळकाचे शीड बांधले जाते व त्यास अग्रभागी बगाड्यास टांगले जाते.
रथ ओढणाऱ्या बैलांवर लाखोंचा खर्च
बगाड यात्रेत शेतकरी वर्गाचे लक्ष पूर्णत: बैलांवर असते. कोणाच्या बैलाने किती चांगल्या पद्धतीने रथ ओढला याची चर्चा महिनाभर परिसरात असते. आपल्या बैलामुळे आपले नाव चर्चेत यावे यासाठी लाखाच्या आसपास किंमत असलेले खिलारी बैल खास बगाडासाठी जतन केले जातात. पोटच्या पोरासारखे बैलांना दोन महिने आधीपासून खुराक, रतीब देऊन रथ ओढण्याऱ्या लाकडी ओंडक्यास जुंपून बैलांचा महिनाभर सराव घेतला जातो.
पार्किंग व्यवस्था व भाविकांसाठी पाणीपुरवठा
बावधन येथे मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे पार्किंग तळ तयार करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यास पोलिसांना यश आले. बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरून त्यावरून सूचना देण्यात येत होत्या. पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी वाहने असल्याने यात्रेकरूंची तृष्णा भागविली जात होती.