स्वरालीचा स्वर टाकीतच घुसमटला !

By Admin | Published: February 10, 2017 10:36 PM2017-02-10T22:36:32+5:302017-02-10T22:36:32+5:30

‘ती’च्या जाण्यानं जिल्हा हळहळला : गावोगावी शोधलं; पण ती घरामागंच सापडली; तीन दिवसांचं सर्च आॅपरेशन क्षणात थांबलं

The sound of the vocal tone intersected! | स्वरालीचा स्वर टाकीतच घुसमटला !

स्वरालीचा स्वर टाकीतच घुसमटला !

googlenewsNext


कऱ्हाड : ‘मुलं ही देवाघरची फुलं,’ असं म्हणतात. पण अशाच एका फुलाचा श्वास बुधवारी टाकीत गुदमरला. जिच्या शोधासाठी सलग तीन दिवस पोलिसांनी जिल्हा पालथा घातला तीच स्वराली तिच्याच घराच्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये मृतावस्थेत सापडली. तीन दिवसांच आशादायी ‘सर्च आॅपरेशन’ शुक्रवारी दुपारी अखेर दुर्दैवानं थांबवावं लागलं. आणि सारा जिल्हा अंत:करणातून हळहळला.
विद्यानगर-सैदापूर येथील ‘ज्ञानगंगा अपार्टमेंट’मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पाटील कुटुंबीयांसाठी बुधवारचा दिवस काळ बनून आला. डॉ. वैभव पाटील यांची चार वर्षांची स्वराली ही चिमुरडी अपार्टमेंटखालून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. डॉ. वैभव यांच्यासह इतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कॉलेजपर्यंत स्वरालीला शोधले. मात्र, ती सापडली नाही. दोन महिलांसोबत स्वरालीला पाहिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अपहरणाची शक्यता बळावली. आणि पाटील कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठलं. अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनीही स्वरालीचा शोध सुरू केला. सायंकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत परिसरातील शिवार पिंजून काढण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली. या ‘सर्च आॅपरेशन’मध्ये सोशल मीडियाही सक्रिय झाला. स्वरालीचा फोटो व इतर माहिती ‘व्हायरल’ झाली.
दरम्यान, गुरुवारी सकाळपासून स्वरालीला पाहिल्याची माहिती ठिकठिकाणाहून समोर येऊ लागली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची दोन, पाटण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पांचाळ यांची दोन, ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांचे एक, उंब्रज पोलिसांचे एक, सातारा शहर पोलिसांचे एक अशी दहा पोलिस पथके या तपासात उतरली. पाटणमधील ज्या महिलेने स्वरालीला अन्य दोन महिलांसमवेत पाहिले होते त्या महिलेकडे चौकशी करण्यात आली. तसेच सातारा येथील राजवाडा परिसरातही स्वरालीला पाहिल्याची चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी तो परिसर पिंजून काढला. विटा येथेही एक पथक खात्रीसाठी पोहोचले. ढेबेवाडी भागातही स्वरालीला पाहिल्याची चर्चा झाल्याने पथक नाईकबापर्यंत पोहोचले. मात्र, या तपास पथकांच्या हाती काहीही लागले नाही. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातून बेपत्ता स्वरालीच्या शोधासाठी हालचाली सुरू होत्या. सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल झाल्यामुळे स्वरालीच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली होती.
शुक्रवारी दुपारी मात्र ही शोधमोहीम दुर्दैवानं थांबवावी लागली. जिचा शोध जिल्हाभर घेतला गेला, ती स्वराली तिच्याच घराच्या पाठीमागील बाजूस ड्रेनेजमध्ये मृतावस्थेत आढळली. स्वरालीचा हा दुर्दैवी मृत्यू जसा तिच्या कुटुंबासाठी धक्कादायक होता तसाच तो पोलिस आणि जिल्हावासीयांसाठीही काळीज पिळवटणारा होता.
‘ती’ तिथं का गेली?
ज्ञानगंगा अपार्टमेंट विस्तीर्ण आहे. या अपार्टमेंटच्या सभोवती संरक्षक जाळीचे कुंपण असून, पाठीमागील बाजूस आणखी एक अपार्टमेंट आहे. स्वराली समोरील बाजूस वाळूत खेळताना अनेकांना दिसली होती. मात्र, ती अपार्टमेंटच्या मागे कधी गेली, हे कोणालाच समजले नाही. दोन मुलींसोबत स्वरालीला खेळताना एका आजींनी पाहिले होते तर स्वरालीला हातात लहानशी काठी घेऊन फुलपाखरांच्या मागे धावताना पाहिल्याचे एका नजीकच्या नागरिकाने पोलिसांना सांगितले.
दोन विहिरी, एक खड्डा तपासला; पण...
ज्ञानगंगा अपार्टमेंटच्या डाव्या बाजूस उसाचे शिवार आहे. तसेच अपार्टमेंटच्या पूर्वेला एक व पश्चिमेला एक अशा दोन विहिरी आहेत. अपार्टमेंटपासून काही अंतरावर एक खड्डाही आहे. दुर्घटना व घातपाताच्या शक्यतेने पोलिसांनी गुरुवारीच संबंधित उसाचे शिवार पिंजून काढले. तसेच दोन्ही विहिरी व खड्ड्यात उतरूनही शोध घेण्यात आला होता.
दोन खेळणी स्वरालीची नव्हती?
ज्ञानगंगा अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस पोलिसांना दोन लहान खेळणी आढळून आली. त्या खेळण्यांवर धूळ साचली होती. ती
खेळणी स्वरालीची असावीत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याबाबत त्यांनी नातेवाइकांकडे चौकशीही केली. मात्र, स्वरालीकडे अशी खेळणी नव्हती, असे नातेवाइकांनी सांगितले आहे.
‘व्हिसेरा’ राखून ठेवला !
स्वरालीचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनीही पोलिसांना तसेच सांगितले आहे. मात्र, सर्व शक्यता गृहित धरून अद्यापही पोलिस चौकशी करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, तो पुढील तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.
शेजारच्या प्रत्येक घराची झडती
बुधवारी रात्री पोलिसांसह परिसरातील युवकांनी शोधमोहीम राबविली. यावेळी परिसरातील प्रत्येक घराची झडती घेण्यात आली. तसेच आसपासची दुकाने, हॉटेल, ढाबा अशा प्रत्येक ठिकाणी शोध घेण्यात आला होता. ज्ञानगंगा अपार्टमेंटसह नजीकच राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली होती. स्वरालीला कधी, कुठे, कुणी आणि कुणासोबत पाहिलं, याची माहिती घेण्यासाठी पोलिस हरतऱ्हेने प्रयत्न करीत होते.

Web Title: The sound of the vocal tone intersected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.