दक्षिण मांड नदीवरील पूल होणार खुला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:43+5:302021-06-19T04:25:43+5:30
कऱ्हाड-चांदोली या रस्त्याचे युनिटी हायब्रीड योजनेतून नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पाचवड फाटा ते शेडगेवाडीपर्यंत अंतिम ...
कऱ्हाड-चांदोली या रस्त्याचे युनिटी हायब्रीड योजनेतून नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पाचवड फाटा ते शेडगेवाडीपर्यंत अंतिम टप्प्यात आला आहे. कऱ्हाड तालुक्याच्या हद्दीपर्यंत तो पूर्ण रस्ता झाला असून, हा रस्ता करताना रस्त्यावरील पुलांची कामेही करण्यात आली आहेत. त्यामध्ये अनेक फरशी पुलांचा समावेश आहे. दक्षिण मांड नदीवर उंडाळेनजीक असलेल्या या पुलाचे गत पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल जमीनदोस्त करून प्रत्यक्ष फेब्रुवारीत नव्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर वादळी पाऊस व नदीला आलेले पाणी यामुळे काही दिवस काम ठप्प झाले. मात्र, तरीही या अडचणीतून मार्ग काढीत ठेकेदाराने काम गतीने हाती घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सध्या पुलाचा वरील स्लॅब पूर्ण झाला असून २१ दिवस झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू होईल.
या पुलाच्या कामामुळे मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. ज्या मार्गावरून ही वाहतूक वळविण्यात आली तो मार्ग सुस्थितीत नव्हता. त्यामुळे सहा महिने वाहनधारकांची गैरसोय झाली. काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीस खुला होईल, असे चित्र आहे. या नदीवरील पुलाच्या बांधकामावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन युवकांचा बळी गेला. त्यामुळे हा पूल अपघातानंतर बराच चर्चेत राहिला. त्यानंतरही पुलाच्या कामावर परिणाम होऊ न देता काम पूर्ण झाले. सध्या हा पूल पूर्ण झाल्याने विभागातील ग्रामस्थ व वाहनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.