कऱ्हाड तालुक्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या!, शेतकरी चिंतेत
By संजय पाटील | Published: July 1, 2023 05:36 PM2023-07-01T17:36:22+5:302023-07-01T17:36:35+5:30
कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पेरा वाया जाऊ नये, यासाठी थांबण्याचा सल्ला दिला आहे
संजय पाटील
कऱ्हाड : मृग नक्षत्रावर पेरणी करून शेतकरी पूर्वी निर्धास्त व्हायचे; पण सध्या ऋतुमान बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे. आषाढ निम्म्यावर आला तरी शेतात कुऱ्या मिरवलेल्या नाहीत. कऱ्हाड तालुक्यात आतापर्यंत केवळ दोन टक्के क्षेत्रातच पेरणी झाली असून ३७ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत.
मान्सूनने हजेरी लावली. आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले. वातावरणात बदलही झाला; पण गत आठ दिवसांपासून एखाद्या हलक्या सरीशिवाय दमदार पाऊसच झालेला नाही. पेरणी व टोकणीसाठी शेतात ओलाव्याची गरज असते. मात्र, ओलावा होईल असा पाऊसच तालुक्यात झालेला नाही. चार बोटांखाली जमीन अद्यापही कोरडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकणी, पेरणीची कामे हाती घेतलेली नाहीत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पेरा वाया जाऊ नये, यासाठी थांबण्याचा सल्ला दिला आहे. ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्यांची गडबड करू नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ४७२ हेक्टर नोंदले गेले आहे. त्यापैकी केवळ १ हजार ३४ हेक्टर म्हणजेच केवळ २ टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली आहे. अद्यापही ९८ टक्के क्षेत्र पेरणीविना पडून आहे.
मंडलनिहाय अपेक्षित पेरणीक्षेत्र
७७९४ : कऱ्हाड
९१६३ : सैदापूर
९९५१ : उंब्रज
११,६६९ : उंडाळे
पीकनिहाय नोंदले गेलेले क्षेत्र
सोयाबीन : १७५८४
भात : ५४२६
भुईमूग : १०२०४
मका : ६८५
तूर : २०
उडीद : ५०
मूग : ३०
सूर्यफूल : १०
अपेक्षित पेरणी
२७०३७ : गळीत धान्य
१०५५८ : तृणधान्य
९८२ : कडधान्य
(सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये)
- ३७५४३ : हेक्टरवरील पेरण्या रखडल्या
- १०३४ : हेक्टरवरील पेरण्या पूर्ण
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. पेरणीसाठी ८० ते ९० मिलिमीटर एवढ्या पावसाची आवश्यकता असते. - डी. ए. खरात, तालुका कृषी अधिकारी