खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

By नितीन काळेल | Published: July 27, 2024 06:48 PM2024-07-27T18:48:18+5:302024-07-27T18:49:02+5:30

चांगल्या पावसामुळे यंदा क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज 

Sowing of kharif season in Satara district on 2 lakh 82 thousand hectares | खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

संग्रहित छाया

सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच चांगला पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पेरणीची टक्केवारी ९७ झाली आहे. त्यामुळे या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९ हेक्टर, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प असते.

मान्सूनच्या पावसावरच खरीप हंगाम घेण्यात येतो. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीही वेळेवर सुरू झाली तसेच पेरणीला वेगही आला होता. त्यामुळे आतापर्यंत ९७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या २ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच खरिपाची पेरणी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत भाताची ८८ टक्के लागण झाली. म्हणजे ३८ हजार ६१७ हेक्टरवर भात घेण्यात आलेला आहे. 

अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत. त्यामुळे क्षेत्रात वाढ होणार आहे. तर ज्वारीची ६ हजार ८४१ हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६९ टक्के झाली आहे. ४१ हजार ७९८ हेक्टरवर पेरणी झाली असून, यंदाही या पिकाखालील क्षेत्र कमी राहणार आहे. मका पिकाची १२० टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १८ हजार १६४ हेक्टर पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भुईमुगाची ९३ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण १२१ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.

खंडाळा तालुक्यात १३९ टक्के क्षेत्रावर पेरणी..

जिल्ह्यात या वर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणीलाही वेग आला. खंडाळा तालुक्यात आतापर्यंत १३९ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यातील खरीप क्षेत्र १० हजार ५५६ हेक्टर आहे, तर पेरणी १४ हजार ६८५ हेक्टरवर झाली आहे. सातारा तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ९५ टक्के आहे. जावळीत १७ हजार ५३२ हेक्टरवर पेरणी झाली असून, ९६ टक्के प्रमाण राहिले आहे.

तसेच पाटण तालुक्यात ४३ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. कऱ्हाड तालुक्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या सुमारे ३७ हजार हेक्टरवर पिके आहेत. कोरेगाव तालुक्यात १०२ टक्के पेरणी झाली. २१ हजार १६२ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ९१ तर माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये सुमारे ४२ हजार, तर माण तालुक्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला १०२, वाई तालुक्यात ९८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातही ९० टक्के पेरणी झालेली आहे.

Web Title: Sowing of kharif season in Satara district on 2 lakh 82 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.