भात तरव्याची पेरणी; शेतकऱ्यांत आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:51+5:302021-06-25T04:27:51+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास परिसरात चांगला पाऊस झाल्याने भात तरवे, नाचणीची पेरणी झाली आहे. या पावसामुळे ...
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास परिसरात चांगला पाऊस झाल्याने भात तरवे, नाचणीची पेरणी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असून लवकरच भात लागणीस सुरुवात होणार आहे.
कास परिसरात तसेच डोंगरमाथ्यावर जूनच्या सुरुवातीसच मान्सूनपूर्व पाऊस चांगल्या प्रकारे झाला, तर त्यापूर्वी वळीव तसेच चक्रीवादळामुळेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यावर्षी पेरणीसाठी योग्यवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कास परिसरात भात तरवे, नाचणीची पेरणी करण्यात आली, तर मागील काही दिवसांत मान्सूनच्या पावसाने सलग चार दिवस मुसळधार प्रमाणात हजेरी लावली होती. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी अधुनमधून पावसाची सर येत आहे. त्यामुळे पाऊस तरव्यांच्या पेरणीस उपयोगी होत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.
कास परिसरात भात तरवे पेरण्या करून २० दिवस झाले आहेत. परिसरात ऊन, पाऊस असा खेळ सुरू असून भाताची, नाचणीची रोपे वाढीस पोषक व अनुकूल असे वातावरण आहे. त्यामुळे भात रोपे हिरवीगार दिसू लागली आहेत. १०-१२ दिवसांनंतर सलग पाऊस झाल्यावर शिवारात भाताची लागण करताना शेतकरी वर्ग पाहायला मिळणार आहे.
भात, नाचणीची रोपे चांगली बहरत असली तरी या रोपांना वन्यपशू, पक्ष्यांचा उपद्रव होत असल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. या रोपांभोवताली सुरक्षित कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहावयास मिळत आहे.
फोटो दि.२४पेट्री फार्म फोटो...
फोटो ओळ : कास पठार परिसरात डोंगरमाथ्यावर समाधानकारक पाऊस पडल्याने भात तरव्याची रोपे चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे चित्र आहे. (छाया : सागर चव्हाण)
\\\\\\\\\\\\\\\\\\\\