पळशी, मार्डी परिसरात पेरण्या रखडल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:10+5:302021-07-05T04:24:10+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी मार्डी परिसरात पुरेसा पाऊसच झाला नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून पेरण्या रखडल्या असून, पाऊस हुलकावणी ...
पळशी : माण तालुक्यातील पळशी मार्डी परिसरात पुरेसा पाऊसच झाला नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून पेरण्या रखडल्या असून, पाऊस हुलकावणी देत असल्याने बळीराजांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाचा जोर चांगला होता. त्यामुळे या वर्षीही पाऊस पडेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. पण पाऊस नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मूग, बाजरीची पेरणी केली होती, ती पिकेही पाणी नसल्याने करपू लागली आहेत. त्यामुळे बळीराजांतून चिंता व्यक्त होत आहे.
पळशी परिसरात कांदापीक धूळवाफ्यावर व लागण पद्धतीने मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार हजार किलो दराने कांदा बियाणे मागील महिन्यात खरेदी केले होते. पण पाऊस नसल्याने बियाणे घरात पडून असल्याने कांदा पीक उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
परिसरातील तळी, तलाव, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, शेतीचे गणितच कोलमडले आहे. परिसरात बाजरी, मका, मूग, कांदा आदी पिके घेतली जातात. त्यामुळे दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे.