बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी : कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:32+5:302021-06-19T04:25:32+5:30
म्हसवड : चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहाय्यक राहुल कांबळे यांनी ...
म्हसवड : चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहाय्यक राहुल कांबळे यांनी केले.
वीरकरवाडी व पुळकोटी येथे तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम बीजप्रक्रिया मोहीम सन २०२१ - २२ अंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी कार्यालय, म्हसवड येथील कृषी पर्यवेक्षक हरिभाऊ वेदपाठक, जयवंत लोखंडे, गणेश माळी उपस्थित होते.
बीजप्रक्रिया व त्याचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राहुल कांबळे पुढे म्हणाले, जमिनीतून व बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे जोमदार वाढण्यासाठी बियाण्यास रासायनिक व जैविक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीजप्रक्रिया असे म्हणतात. रासायनिक घटकांमध्ये बुरशीनाशक व कीडनाशकांची, तर जैविक घटकांमध्ये अझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम (तृणधान्य वर्गीय पिकांसाठी), स्फुरद विरघळणारे जिवाणू, रायझोबियम (कडधान्यवर्गीय पिकांसाठी) या जीवाणूंची बियाण्यास प्रक्रिया केली जाते.
बियाण्याला विविध कीड व रोगांपासून वाचविण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. हरिभाऊ वेदपाठक व जयवंत लोखंडे यांनी बाजरी बियाण्यास जिवाणू संवर्धकाच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कृषिमित्र राधेश वीरकर, शंकर वीरकर व शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
180621\img-20210617-wa0045.jpg
===Caption===
विरकरवाडी- शेतक-यांना बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करुन दाखविताना राहूल कांबळे,हरिभाऊ वेदपाठक, जयवंत लोखंडे,