सोयाबीनचा दरात होतेय घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:09+5:302021-09-25T04:42:09+5:30
कुडाळ : खरिपाच्या हंगामातील हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनचे अधिक उत्पादन घेतले जाते. सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ...
कुडाळ : खरिपाच्या हंगामातील हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनचे अधिक उत्पादन घेतले जाते. सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यापूर्वी असणारा ११ हजार प्रति क्विंटलचा दर आता हंगाम सुरू झाल्यावर मात्र पाच ते सहा हजारांपर्यंत खाली आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
ऊस, हळद यासारख्या नगदी पिकांप्रमाणेच खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती पैसे येत असतो. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ते जुलैमध्ये या पिकांची पेरणी केली जाते. ९० दिवसांच्या आता या पिकाची काढणी होते. कमी कालावधीत यातून हमखास उत्पादनही मिळते. यामुळेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा या भागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते.
यावर्षी मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झालेला दिसत आहे. कमी आवक असल्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी सोयाबीनचा दर वाढलेला होता. हा दर कायम राहील आणि यावर्षी आपणाला चांगला आर्थिक फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना आशा वाटत होती. मात्र, सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरुवात झाली अन् शेतकऱ्यांची ही सारी आशा फोल ठरली. काढणीचा हंगाम सुरू झाल्याबरोबर सोयाबीनचा दरही झपाट्याने खाली आला. दर निम्यावर आल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. सोयाबीन आहे, त्या दरात विक्री करावी की दर वाढण्याची प्रतीक्षा करावी, आशा संभ्रमात शेतकरी अडकला आहे.
(चौकट)
शेतकऱ्यांची घोर निराशा...
निसर्ग आणि शेती हे गणित जुळलं तरच खरं, अन्यथा राबणाऱ्या हातांच्या पदरी निराशाच, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. सोयाबीनला असणारा ११ हजारांचा दर आज हंगाम सुरू होताच निम्म्यावर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा विचार करता होणारा खर्च, कष्ट आणि पीक हातात आल्यावर मात्र मिळणारा दर चिंतेचा विषय आहे. याचा विचार होऊन शेतमालाला योग्य भाव मिळणे अपेक्षित आहे.