सोयाबीनसाठी खर्च २५ हजार, उत्पन्न मिळाले सात हजार; खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 02:09 PM2022-11-17T14:09:54+5:302022-11-17T14:10:15+5:30

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला

Soybeans cost 25 thousand, income received 7 thousand, Loss of farmers due to rain in Kharif season | सोयाबीनसाठी खर्च २५ हजार, उत्पन्न मिळाले सात हजार; खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सोयाबीनसाठी खर्च २५ हजार, उत्पन्न मिळाले सात हजार; खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

googlenewsNext

शंकर पोळ

कोपर्डे हवेली : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांचा सतत वांदा केला. त्यामुळे पीक नुकसानीला सामोरे जावे लागले. कऱ्हाड तालुक्यातील शामगावचे शेतकरी यशवंत चंद्रू पोळ यांना तर एक एकर क्षेत्रातून फक्त १३० किलोच सोयाबीन मिळाले. पैशामध्ये विचार केल्यास सोयाबीनची किंमत ७ हजार होते; पण त्यासाठी २४ हजार ८०० रुपये खर्च झाला आहे.
 
शामगाव येथील यशवंत पोळ हे पाण्याची उपलब्धता बघूनच दोन पिके घेतात. यंदाच्या हंगामात त्यांनी खरिपाचे पीक म्हणून सोयाबीनची एक एकरावर लागवड केली होती. यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा सुरू झाल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन पिकाची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पुढील १५ दिवसांपासून पावसाची सतंतधार सुरू झाली. तर फुलकळी लागण्याच्या वेळी पाऊसच गायब झाला.

नंतरच्या काही दिवसांत पावसाने पुन्हा सुरुवात केली. हा पाऊस काढणीपर्यंत सुरूच होता. त्यामुळे  पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उघडीपीनंतर रानातून सोयाबीन काढून आणले. त्यानंतर मळणी केल्यावर केवळ एक एकर क्षेत्रावर १३० किलोच सोयाबीन झाले. याची किंमत सध्याच्या दराने साडेसहा ते सात हजार होत आहे. पण, या शेतकऱ्याने सोयाबीन घेण्यापासून काढणीपर्यंत २५ हजार रुपये खर्च केला. उत्पादन पाहता हा सर्व खर्च वायाच गेला आहे. खरिपाने दगा दिला, आता रब्बी हंगाम काहीतरी आधार देईल, आशा आशेवर पोळ आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला. त्यातच डोंगरी गाव म्हणून शासनाच्या सुविधाही मिळत नाहीत. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणून आम्ही शेती करतो; पण यावर्षी सोयाबीन पिकातून घातलेला खर्चही निघालेला नाही.  - यशवंत पोळ, शेतकरी  

 

खर्च असा
    
नांगरट २५०० रुपये, फणणी १५००, पेरणी १६००, बियाणे २५००, खते १९००, औषधांची फवारणी ५ हजार रुपये, कोळपणी १ हजार, भांगलणी ३ हजार, काढणी ३ हजार , मळणी ३०० आणि मजुरी १ हजार

Web Title: Soybeans cost 25 thousand, income received 7 thousand, Loss of farmers due to rain in Kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.