जानकरांची ठिणगी... पवारप्रेमींचा भडका!

By admin | Published: October 13, 2016 02:25 AM2016-10-13T02:25:24+5:302016-10-13T02:38:33+5:30

‘राष्ट्रवादी- रासप’मध्ये संघर्ष टोकाला : साताऱ्यातही प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन--बातमी नंतरची बातमी

The spark of the people ... the tremors of the family! | जानकरांची ठिणगी... पवारप्रेमींचा भडका!

जानकरांची ठिणगी... पवारप्रेमींचा भडका!

Next

सातारा : नगरमधील भगवानगडावर राज्याचे दुग्धविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. ‘बारामतीला संपविल्याशिवाय राहणार नाही,’ अशी शाब्दिक ठिणगी त्यांनी टाकली. त्याचा आगडोंब साताऱ्यात पाहायला मिळाला. पवारप्रेमींनी जोरदार निषेधाच्या घोषणा देत मंत्री जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन साताऱ्यातील पोवई नाक्यावर केले.
भगवानगडावरील दसरा मेळाव्यात जमलेल्या गर्दीला संबोधित करताना मंत्री जानकर यांनी मंगळवारी बारामतीकरांच्या राजकारणावर चौफेर टीकास्त्र सोडले होते. गडावरील महंतांनी यावर्षी दसरा मेळाव्यात गडावर कोणतेही राजकीय भाष्य करण्यावर बंदी घातली होती. यामागे अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप जानकर यांनी आपल्या भाषणात केला. एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे यांना रोखण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले. ज्यांच्या मेहरबानीने धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता पद मिळविले, ते अजित पवारांचे चमचे आहेत, अशी टीका जानकरांनी केल्यानंतर साताऱ्यात त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पोवई नाक्यावर रास्ता रोको करून महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. (प्रतिनिधी)


जानकर म्हणे भाषणावेळी
उत्साहाच्या भरात बोलले
मंत्री महादेव जानकर यांना बारामती संपवतो, असे नव्हे तर छल-कपट करणाऱ्या बारामतीकरांना संपवतो, असे म्हणायचे होते. भगवानगडावर उत्साहाच्या भरात बोलण्याच्या नादात ते बोलून गेले. त्यांना तसे म्हणायचे नव्हते. अशी सारवासारव राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

आता मी मौन पाळणार : इति जानकर
सातारा : भगवानगडावर केलेल्या भाषणातून उपस्थितांच्या टाळ्या व शिट्ट्या मिळविणारे मंत्री महादेव जानकर आता तीन दिवस कोणाशी काही बोलणार नाहीत. ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत महादेव जानकरांनी ‘आता मी मौन पाळणार आहे,’ असे स्पष्टीकरण केले आहे.
‘भगवानगडाची शपथ घेऊन सांगतो...बारामतीला संपवल्याशिवाय राहणार नाही,’ अशा भाषेत जानकरांनी आपला संताप व्यक्त केला होता. जानकर यांचा रोख अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर होता. मात्र त्यांनी ‘बारामतीला संपवतो,’ असे वक्तव्य केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. ज्या बारामतीतून जानकर यांनी निवडणूक लढली. मतदारांनी त्यांच्या बाजूने चांगला कौलही दिला. त्याच मतदारांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली.
या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘या विषयावर मी मौन बाळगणे पसंत करेन. आणखी तीन-चार दिवस जाऊ द्या, त्यानंतर मी याबाबत सविस्तर बोलेन, मी मीटिंगमध्ये आहे,’ या स्पष्टीकरणावरून आपण केलेल्या भाषणाबाबत जनमानसातून आलेल्या प्रतिक्रियांनी जानकर यांनी शांत राहणे पसंत केल्याचे समोर येते. राष्ट्रवादी-राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेला संघर्षही विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केलेल्या वक्तव्याबाबत जानकर काय स्पष्टीकरण करतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Web Title: The spark of the people ... the tremors of the family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.