सभापती म्हणे... मेहरबानी केली!
By admin | Published: September 10, 2014 10:05 PM2014-09-10T22:05:04+5:302014-09-11T00:15:08+5:30
शोभा कदम : ताडपत्री वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप
पाटण : पंचायत समितीत अनुदानावर मिळणाऱ्या ताडपत्र्यांवर सभापती-उपसभापतींनी ताबा मिळवून वाटपात दुजाभाव केला, हा कोणता नियम आहे. एका सदस्याला पाच तर दुसऱ्याला दहा ताडपत्र्या दिल्या ही तफावत सभापतींनी केली. आणि उलट सभापती म्हणतात की, ताडपत्री दिल्या ती मेहरबानी समजा, हा कोणता न्याय आहे. सभापतींनी ताडपत्र्या पळविल्या, याची चौकशी करा, अशी मागणी करत सदस्या शोभा कदम यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.
सभापती वनिता कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची सभा झाली. पाटण तालुक्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ६३ उपकेंद्रे आहेत. या ठिकाणी डॉक्टर निवासी राहत नाहीत. निम्म्यावर उपकेंद्रे बंद आहेत.
दुर्गम भागातील जनतेने नेमकी कुणाकडे दाद मागायची, असा सवाल सदस्य डी. आर. पाटील यांनी केला. पळशी शाळेचे मुख्याध्यापक गेल्या दोन वर्षांपूर्वी बदलून गेले. शाळेच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून, या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नथुराम कुंभार यांनी केला. सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. अनेकांनी एकमेकांच्या पक्षांचे उणेदुणे काढले. (प्रतिनिधी)