अतिवृष्टीबाबत संपर्कासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:15+5:302021-07-28T04:40:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तातडीने संपर्क साधता यावा म्हणून ग्रामपंचायत विभागाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तातडीने संपर्क साधता यावा म्हणून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत असून धरण प्रशासनाकडून धरणातील पाण्याची आवक वाढेल तसा, विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता खचणे, भूस्खलन तसेच पूर यासारखी कोणतीही आपत्ती उद्भवू शकते. अशी आपत्ती उद्भवल्यास बहुतांश वेळा स्थानिक पातळीवरील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधताना अडचणी येतात. हा संपर्क साधणे अत्यंत गरजेचे असते. हा सर्व विचार करता कार्यालयीन सुट्टीच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद स्तरावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षामध्ये विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक अशा दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग तसेच ग्रामपंचायत विभागातील हे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संबंधित स्थानिक प्रशासनाबरोबर तातडीने संपर्क करून व समन्वय साधून आपत्तीबाबत वस्तुस्थितीदर्शक व खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देणार आहेत.
स्थानिक प्रशासनाने नियंत्रण कक्षातील संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क केल्यास त्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा. आपत्तीची व्याप्ती मोठी असल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा प्रशासनास देण्यात यावी, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
.........................................................................