‘विशेष मुलांचा’ देखणा कलाविष्कार

By admin | Published: January 28, 2015 10:50 PM2015-01-28T22:50:02+5:302015-01-29T00:10:15+5:30

चिमुकले भारावले : ‘ईशा’च्या स्नेहसंमेलनात ‘आपुलकी’लाही संधी

'Special Children' handsome art discovery | ‘विशेष मुलांचा’ देखणा कलाविष्कार

‘विशेष मुलांचा’ देखणा कलाविष्कार

Next

सातारा : येथील इशा स्कूलच्या स्नेहसंमेलनात पाचवड येथील ‘आपुलकी’ शाळेतील विशेष मुलांनी देखणा कलाविष्कार सादर करून उपस्थितांना अचंबित केले. शाहू कलामंदिर येथे इशा स्कूल व एज्युकेशन सेंटरचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आपुलकी’ शाळेतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिले होते. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, ही भावना त्या ‘विशेष’ मुलांमध्ये निर्माण होऊ नये, त्यांनाही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वागविले जावे, या उदात्त हेतूने स्कूलचे व्यवस्थापन ‘आपुलकी’ने त्या विशेष मुलांना कला सादर करण्यास प्रोत्साहन देत असते.
स्नेहसंमेलनात इशा स्कूलच्या दोन ते तीन वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी देशभक्तिपर, बडबड गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर केले. भारतातील विविध प्रांतातील कला प्रकारही चिमुकल्यांनी सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली.‘आपुलकी’च्या दहा विद्यार्थ्यांनी ‘माउली, माउली...’ या चित्रपट गीतावर सादर केलेला नृत्याविष्काराला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. या नृत्यात दहा विद्यार्थी सहभागी झाले होते, तर आठ विद्यार्थी त्यांना नृत्याची तयारी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत होते. कुणी व्हीलचेअरवरून येऊन मदत करत होते तर कुणी सजावटीचे काम करीत होते. या मुलांचा कलाविष्कार पाहून उपस्थित अक्षरश: भारावून गेले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी प्रतिभा मुदगल, इशा स्कूलच्या संस्थापिका प्राची शहा, ‘आपुलकी’च्या मुख्याध्यापिका सुषमा पवार, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, त्यांच्या पत्नी नीलम चव्हाण, शिक्षक , विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मेडल गळ्यात पडताच मुले भारावली
‘आपुलकी’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार पाहून उपस्थित अचंबित झाले अन् गळ्यात कौतुकाचं मेडल पडताच ती ‘विशेष’ मुलं अक्षरश: भारावून गेली. आजपर्यंत अशा पद्धतीनं कुणी त्यांचं कौतुक कधी झालंच नव्हतं. त्यामुळे त्या मेडलकडे पाहताना त्या मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज अन् इतर मुलांप्रमाणे आपल्यालाही स्टेजवर नाचता आल्याचा आनंद दिसत होता.

Web Title: 'Special Children' handsome art discovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.