शारीरिक तंदुरुस्तीवर ही गोंदवल्यातील चैतन्य विलगीकरण केंद्रात विशेष भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:55+5:302021-05-28T04:27:55+5:30
म्हसवड : कोरोना बाधितांची औषधोपचारासह इतर खबरदारी घेतली जातेच ; शिवाय मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीवर ही गोंदवल्यातील चैतन्य ...
म्हसवड : कोरोना बाधितांची औषधोपचारासह इतर खबरदारी घेतली जातेच ; शिवाय मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीवर ही गोंदवल्यातील चैतन्य विलगीकरण केंद्रात विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे रुग्ण लवकर बरे होत असल्याचे सकारात्मक परिणाम येथे पहायला मिळत आहेत.
गोंदवल्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी चैतन्य कोविड रुग्णालय व विलगीकरण कक्ष सुरू आहे. गोंदवलेकर संस्थान, ड्रीम सोशल फाउंडेशन, आम्ही गोंदवलेकर ग्रुप यांच्यासह विविध संस्था व दानशूरांच्या सेवाभावी विचाराने सुरू असलेल्या या केंद्रात कोरोनामुक्तीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. औषधोपचार बरोबर रुग्णांची विशेष काळजी घेतली जातेच ; शिवाय रुग्णांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक कक्षात टीव्हीद्वारे सकाळी व संध्याकाळच्या वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्याने रुग्णांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होण्यास चालना मिळत आहे.
वडूज येथील फिजिओथेरपीस्ट डॉ. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाने रोज सकाळीच्या कोवळ्या उन्हात अर्धा तास व्यायाम घेतला जात आहे. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास मदत होत असल्याचे परिणाम रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. याशिवाय विलगीकरणातील तरुण रुग्ण देखील संध्याकाळच्या वेळी क्रिकेटमध्ये रमून जात आहेत. खबरदारी घेत खेळकर वातावरण निर्मितीमुळे रुग्णांमधील नकारात्मक विचार नाहीसे होण्यास चांगली मदत होत आहे.
गोंदवलेकर संस्थानच्या रुग्णालयात सेवाभावाने उपचार करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांसह इतरांचे या कोरोना काळात ही विशेष सहकार्य मिळत आहे. परिणामी येथील रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसत आहे.
कोट
सकारात्मक विचार व नियमित व्यायामाच्या माध्यमातून कोरोनावर सहज मात करता येऊ शकते. गोंदवल्यातील विलगीकरण केंद्रात सेवा केल्याचे समाधान मिळत आहे.
- डॉ. अविनाश पवार, फिजिओथेरपीस्ट, वडूज