Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष
By नितीन काळेल | Published: April 5, 2024 07:33 PM2024-04-05T19:33:26+5:302024-04-05T19:33:53+5:30
पथक प्रमुखांची बैठक : मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान
सातारा : मागील लोकसभा निवडणुकीत २२८ केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. त्यामुळे संबंधित केंद्रावरील मतदान वाढण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३९ पथक प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन होत्या. या आढावा बैठकीस ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा स्वीप कक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये सर्व पथक प्रमुखांकडून केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तर या उपाययोजना अधिक परिणामकारकरित्या व प्रभावीपणे राबवाव्यात, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी केली.